गणेशपूर परिसरात भटक्या कुत्र्यांचा विद्यार्थ्यावर हल्ला
पायाचा घेतला चावा : सुदैवाने विद्यार्थी बचावला : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वार्ताहर /किणये
विनायकनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर परिसरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. भटक्या कुत्र्यांच्या कळपातील एका कुत्र्याने विनायकनगर, गणेशपूर येथील विद्यार्थ्यावर हल्ला केला. यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला असून सुदैवाने तो बचावला आहे. सदर हल्ल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडला आहे. भटक्या कुत्र्यांचा वावर या परिसरात वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शौर्य तेजस सांबरेकर (वय 12) रा. विनायकनगर, गणेशपूर असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहे. त्याच्यावर शनिवारी सायंकाळी सरकारी इस्पितळात उपचार करण्यात आले असून तब्येतीमध्ये सध्या सुधारणा झाल्याची माहिती त्याच्या आई-वडिलांनी दिली आहे.शौर्य हा शनिवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान आपल्या विनायकनगर येथील घरातून ट्युशनला निघाला होता.
यावेळी भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. तसेच पाच-सहा कुत्र्यांनीही त्याच्यावर हल्ला केला. मात्र त्याने आपल्या हातात असलेल्या बॅगने कुत्र्यांना हुसकावून लावले. मात्र एका कुत्र्याने त्याच्या डाव्या पायाचा चावा घेतला. यामुळे तो गंभीर जखमी झाला. शौर्य याला शनिवारी सायंकाळी सरकारी इस्पितळात दाखल करून उपचार करण्यात आले. यामुळे भागातील नागरिकांनी शनिवारी सायंकाळीच तातडीची बैठक घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात हिंडलगा ग्राम पंचायतीला निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. बैठकीला शिवाजी वाडीवाले, हरिश्चंद्र पाटील, रवी पाटील, रवी कुलकर्णी, सुरेश लाड, डॉक्टर थोताड, ग्राम पंचायत सदस्य प्रवीण पाटील, गोरल सर आदी उपस्थित होते. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करा : शिवाजी वाडीवाले
विनायकनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी तसेच नागरिकांना गल्यांमधून ये-जा करणे मुश्कील झाले आहे. शनिवारचा प्रकार पाहून अक्षरश: सर्व नागरिक भयभीत झालेले आहेत. गेल्या सात ते आठ महिन्यांत भटक्या कुत्र्यांनी यापूर्वीही आठ मुलांवर हल्ला केलेला आहे. मात्र भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकडे हिंडलगा ग्राम पंचायतचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. हिंडलगा ग्रामपंचायतीने शनिवारी घडलेल्या या प्रकाराबद्दल गांभीर्याने विचार करून, या भागातील भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी आमची मागणी आहे.