महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वादळी, पण बेभरवशाचा...निकोलस पूरन !

06:00 AM Sep 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यष्टीरक्षक-फलंदाज निकोलस पूरन एक वेळ अपघातातून सावरून कारकीर्द पुन्हा सुरू करू शकेल की नाही याविषयी साशंकता होती...आज तोच नुसता वेस्ट इंडिजच्या ‘टी-20’ नि एकदिवसीय सामन्यांतील महत्त्वाच्या आधारस्तंभांपैकी एक बनलेला नाहीये, तर आपल्या तुफानी शैलीच्या जोरावर एकामागून एक विक्रम मोडत चाललाय...

Advertisement

भारताचा रिषभ पंत आणि वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन यांच्यात साम्य ते काय ?...असं विचारल्यावर क्रिकेटचा जाणकार रसिक लगेच सांगेल...दोन्ही खेळाडू यष्टीरक्षण करतात अन् दोघांचाही बाज आक्रमक क्रिकेटचा...पण हे साम्य इतक्यावरच संपत नाहीये...2022 च्या डिसेंबर महिन्यात पंतला जसा अपघात झाला होता तसाच प्रकार पूरनच्या बाबतीत देखील नऊ वर्षांपूर्वी घडला होता. त्याची कारकीर्द संपल्यात जमा की काय अशी शंका भेडसावण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती...

Advertisement

6 जानेवारी, 2015...त्रिनिदाद नि टोबॅगोचं बालमेन येथील राष्ट्रीय क्रिकेट केंद्रातील प्रशिक्षण सत्र संपवून तो घरी परतत होता. त्यावेळी नवोदित पूरन 19 वर्षांचा. यष्टिरक्षक दिनेश रामदिनचा वारसदार या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं जात होतं...पण नियतीनं त्याचा तो हंगाम सुरू होण्याआधीच संपविण्याचं ठरविलं होतं...‘मला दुसऱ्या वाहनानं जोरदार धडक दिल्यानंतर मी कारमधून बाहेर फेकलो गेलो. त्यानंतर काय घडलं ते मला आठवत नाही. मी शुद्धीवर आलो तेव्हा धक्काच बसला. मला पाय हलवता येत नव्हते. डावा ‘पॅटेलर टेंडन’ फाटला होता उजव्या पायाचं पाऊल फ्रॅक्चर झालं होतं. डॉक्टरांना सर्वप्रथम विचारलं, मी पुन्हा क्रिकेट खेळू शकेन की नाही ?’, निकोलस पूरन त्या आठवणींना उजाळा देतो...

सुदैवानं त्याच्यावर झालेल्या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या...पुढचे चार महिने सुधारणा गोगलयीच्या गतीनं होऊन पूरनला बराचसा काळ काढावा लागला तो व्हीलचेअरवर. त्याला कसल्याही आधाराविना चालता येण्यासाठी सहा महिने उजाडावे लागले...म्हणून रिषभ पंतला नेमक्या कुठल्या उलथापालथीतून जावं लागलेलं असेल याची त्याला पक्की कल्पना आहे...‘ही प्रक्रिया खूप आव्हानात्मक अन् ती इतर कुणाला समजण्यासारखी नाही. काही वेळा तुम्ही खूप उदास नि निराश होता. कारण तुम्हाला ठीक होण्याची प्रक्रिया वेगानं व्हावी असं वाटतं, पण ते अवघड असतं. पूर्ण सावरण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो आणि त्याला संयमानं सामोरं जावं लागतं’, पूरन म्हणतो...

अपघातापूर्वीच्या प्रथम श्रेणी सामन्यानंतर 18 महिन्यांनी निकोलस पूरन पहिली लढत खेळला तो ‘कॅरिबियन प्रीमियर लीग’मध्ये...त्या स्पर्धेतील कामगिरी त्याला पहिल्यांदाच वेस्ट इंडिज संघाची दारं उघडून गेली. सप्टेंबरमध्ये पाकिस्तानविऊद्ध संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेली ती टी-20 मालिका विंडीजला 0-3 अशी गमवावी लागली आणि खुद्द पूरनला तीन सामन्यांमध्ये करता आल्या अवघ्या 25 धावा...परंतु तो निराशा झाला नाही. कारण वयाच्या 20 व्या वर्षी तो वेस्ट इंडिजतर्फे मैदानात उतरू शकला. शिवाय इस्पितळातील खाटेवर जाग आल्यावेळी आपल्याला पुन्हा कधीही खेळता येणार नाही या भीतीनं ग्रासल्यानंतर दोन वर्षांहून कमी वेळेत त्यानं ही भरारी घेतली...

‘बिग हिटर’ म्हणून उदयास येताना शालेय क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडीत काढणारा हा डावखुरा शैलीदार फलंदाज खरं तर सर्वप्रथम सर्वांच्या नजरेत भरला होता तो 2013 च्या ‘सीपीएल’मधूनच. त्यावेळी तो अवघा 16 वर्षांचा...‘त्रिनिदाद रेड स्टील’साठी निकोलस पूरनला करारबद्ध करण्यात आल्यानंतर तो त्या लीगमध्ये खेळणारा सर्वांत तऊण खेळाडू बनला...2014 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत विंडीजचं प्रतिनिधीत्व करताना सहा सामन्यांत 303 धावा फटकावल्यानं आणि स्पर्धेतील चौथा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरल्यानं तो कुतुहलाचा विषय बनल्याशिवाय राहिला नव्हता...

पूरननं आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाची चव चाखली ती 2018 च्या उत्तरार्धात, चेन्नईतील भारताविऊद्धच्या ‘टी-20’ लढतीत केवळ 24 चेंडूंत पहिलं अर्धशतक झळकावून..त्यानंतर 2019 च्या प्रारंभी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याच्या वाट्याला एकमेव सामना आला. त्यातही पदार्पणात खातं देखील उघडता आलं नसलं, तरी त्याला इंग्लंडमधील विश्वचषकासाठीच्या संघात स्थान देताना 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये मर्यादित अनुभव असूनही चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात आली. ही स्पर्धा त्याच्यासाठी खरी कलाटणी देणारी ठरली. निकोलस पूरननं त्यात इंग्लंड नि अफगाणिस्तानविऊद्ध अर्धशतकं, तर श्रीलंकेविऊद्ध शतक झळकावत विश्वचषक पूर्ण केला तो 52.47 च्या सरासरीनं तसंच 100 च्या ‘स्ट्राइक रेट’नं...

निकोलस पूरनचं दुखणं हे अन्य काही वेस्ट इंडिज क्रिकेटपटूंसारखंच. अंगात गुणवत्ता ठासून भरलेली असली, तरी त्याला सदोदित ग्रासलंय ते सातत्याच्या अभावानं...2021 च्या ‘टी-20 विश्वचषका’त त्याला केवळ 113 धावा करता आल्या. 2022 च्या भारत दौऱ्यात वेस्ट इंडिजनं तिन्ही लढती गमावल्या असल्या, तरी पूरननं मात्र सलग तीन अर्धशतकं झळकावली. परंतु पुढं फॉर्मला गळती लागून त्याला आपल्या डावाचं दुहेरी आकड्यातील धावसंख्येमध्ये रूपांतर करण्यात सुद्धा अपयश येऊ लागलं. 2022 मधील ‘टी-20’ विश्वचषकाच्या पात्रता फेरीतच वेस्ट इंडीज गारद होण्याचं तेही एक कारण...

निकोलस पूरनची तुलनेनं एकदिवसीय सामन्यांत 2020 नि 2021 मध्ये कामगिरी चांगली राहिली. 2022 साली त्यानं 21 सामन्यांतून 511 धावा जमविल्या, तर 2023 त्याहून उत्कृष्ट राहिलं. त्या वर्षात पूरननं 9 लढतींतून 61.14 च्या सरासरीने 428 धावा नोंदविल्या अन् त्यात अंतर्भाव राहिला तो दोन शतकांचा...2019 च्या विश्वचषकातील प्रतापानंतर उपकर्णधारपद देण्यात आलेल्या निकोलसकडे केरन पोलार्डच्या निवृत्तीनंतर 2022 च्या मे महिन्यात टी-20 नि एकदिवसीय अशा दोन्ही संघांचं अधिपत्य सोपविण्यात आलं होतं. यंदाच्या मेपर्यंत ही जबाबदारी त्याच्याकडे राहिली...पूरननं वेस्ट इंडिजचं नेतृत्व केलं ते 17 एकदिवसीय व 23 टी-20 सामन्यांमध्ये अन् दोन्ही प्रकारांत मिळून 12 सामन्यांत संघानं विजयाची नोंद केली...

परंतु दोन वेळचा विजेता वेस्ट इंडिज एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच पात्र ठरू शकला नाही अन् पूरनच्या नेतृत्वाखालील संघाला स्कॉटलंड व आयर्लंडकडूनही पात्रता फेरीत पराभव पत्करावे लागले. त्यानंतर त्यानं कर्णधारपदाला सोडचिठ्ठी दिली...यंदाच्या मायभूमीत झालेल्या ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेतही त्याच्या हातून फारशी चमकदार कामगिरी झाली नाही. अपवाद अफगाणिस्तानविरुद्धच्या 98 धावांचा अन् इंग्लंडविरुद्धच्या 36 धावांचा...भलेही निकोलस पूरन भरवशाचा नसला, तरी हा फलंदाज मैदानावर उतरतो तेव्हा प्रतिस्पर्ध्यांनी धास्ती घ्यावी इतकी ख्याती त्यानं निश्चितच मिळविलीय !

‘आयपीएल’मध्ये...दुर्लक्षित ते ‘इन डिमांड’ !

वादळी पराक्रम...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article