वादळ-पावसाचा युएईला पुन्हा तडाखा
बससेवा रद्द : अनेक विमानोड्डाणे रद्द
वृत्तसंस्था /दुबई
संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर पुन्हा एकदा हवामान बिघडले आहे. अबुधाबी आणि दुबईमध्ये गुऊवारी जोरदार वादळ आणि पाऊस झाला. दुबईमध्ये बससेवा बंद करण्यात आली असून उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. दुबईत पहाटे तीनच्या सुमारास वादळासोबत पाऊस सुरू झाल्यामुळे दुबईला येणारी 5 उड्डाणे इतरत्र वळवण्यात आली. तसेच इतर काही विमानोड्डाणेरद्द करण्यात आली. जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. पावसाळी ढगांनी दुबईसह आसपासच्या अनेक भागात प्रवेश केला आहे. असेच वातावरण 3 मे पर्यंत कायम राहण्याची शक्मयता आहे. हवामान खात्याने नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी दुबईसह अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला होता आणि रस्ते पाण्याने भरले होते. गुरुवारी पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती झाली. अनेक भागात पाणी साचले असून दैनंदिन जीवनमान कोलमडले आहे. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाकडून मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.