ऊस कारखान्यांमधील वजनकाट्यातील फसवणूक थांबवा
बेळगाव : उत्तर कर्नाटक हा ऊस उत्पादक विभाग म्हणून ओळखला जातो. परंतु, या ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी लयाला जात आहेत. त्यामुळेच ऊस कारखान्यांमधील वजनकाट्यातील फसवणूक थांबवावी, 30 किलोमीटरच्या परिघातील ऊसतोडणी प्रथमत: करावी, यासह विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघ कर्नाटक प्रदेशच्यावतीने बुधवारी सुवर्ण विधानसौध येथे आंदोलन करण्यात आले.
रंगराजन समितीच्या अहवालानुसार उसाच्या उपउत्पादनापासून मिळणाऱ्या नफ्यातील 30 टक्के भाग हा कारखान्यांसाठी तर उर्वरित 70 टक्के भाग शेतकऱ्यांना दिला पाहिजे. ऊसतोड आणि वाहतुकीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. 30 किलोमीटरच्या परिघात असलेल्या ऊस व 120 किलोमीटरच्या परिघात असलेला ऊस याचा वाहतूक खर्च समान आकारला जात आहे. त्यामुळे यामध्ये दुरुस्ती करणे गरजेचे आहे. कारखान्यांमधील वजनकाट्यांमध्ये फेरफार करण्यात आल्याचे प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. वजनकाट्यात फसवणूक केली जात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
ऊस पुरवठ्यानंतर पंधरा दिवसांच्या आत बिलाची पूर्ण रक्कम द्या
ऊस पुरवठा झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना बिलाची पूर्ण रक्कम देण्यात यावी, काही कारखाने सहा ते सात महिने उशिराने बिले देत असल्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा कारखान्यांकडून वापरला जात आहे. यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी बेळगाव जिल्ह्यासह धारवाड, विजापूर, बागलकोट येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.