बाजारातील पाच दिवसांच्या तेजीला विराम!
सेन्सेक्स 199 तर निफ्टी 65 अंकांनी नुकसानीत
मुंबई :
मागील काही दिवसांपासून शेअरबाजारात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक हे तेजीचा प्रवास करत होते. परंतु मागील पाच दिवसांच्या तेजीला नवीन आठवड्याच्या दुसऱ्या सत्रात पूर्णविराम मिळाल्याचे दिसून आले. जागतिक बाजारांमध्ये घसरणीचा कल राहिल्याचे पडसाद हे मंगळवारी भारतीय बाजारावर दिसले. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि एचसीएल टेक यासह दिग्गज कंपन्यांच्या समभागांमध्ये नफा वसुलीच्या कारणास्तव घसरणीचा कल राहिला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने मंगळवारी दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 199.17 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 73,128.77 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 65.15 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 22,032.30 वर बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये सेन्सेक्समध्ये टाटा स्टीलचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 1.70 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. यासोबतच टायटन, मारुती सुझुकी, आयटीसी, टाटा मोर्ट्स, लार्सन अॅण्ड टुब्रो, एशियन पेन्ट्स, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग वधारुन बंद झाले.
अन्य कंपन्यांमध्ये एचसीएल टेकचे समभाग हे सर्वाधिक प्रभावीत झाले असून यासह विप्रो, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टेक महिंद्रा, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स यांचे समभाग हे घसरणीत राहिले आहेत.
स्मॉलकॅप-मिडकॅपही प्रभावीत
बीएसई मिडकॅपच्या निर्देशांकाने कामगिरी दरम्यान नव्या विक्रमाची नोंद केली होती मात्र अंतिम क्षणी सेन्सेक्समध्ये 0.31 टक्क्यांची घसरण राहिली. बीएसई स्मॉलकॅपचा निर्देशांक 0.43 टक्क्यांसह 44,361.39 वर बंद झाला.
रॉयटर्सच्या अहवालानुसार आशियातील समभाग एक महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचलेत. अमेरिकन बाजारात घसरण राहिली होती. आशियातील बाजारात सियोल, टोकीओ आणि हाँगकाँग घसरले असून शांघाय मात्र तेजीत राहिला आहे.