गर्दी रोखणे की वेठीस धरणे?
बॅरिकेड्स लावून रस्ते बंद : नागरिकांची गैरसोय होणार नाही, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे
बेळगाव : ‘वाढता वाढता वाढे’ या म्हणीनुसार शहरात वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. जागा कमी, अरुंद रस्ते आणि भरमसाट वाहने, असे चित्र आता नवीन राहिले नाही. मात्र, त्यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी अचानक बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करणे एवढेच प्रशासनाला आणि वाहतूक पोलीस विभागाला माहिती आहे. तथापि, याची पूर्वकल्पना देण्याइतके तारतम्यही प्रशासनाला नसावे, ही खेदाची बाब आहे. सोमवारी सकाळी शहरात ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते अडविण्यात आल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. वेळेचाही अपव्यय झाला. त्याऐवजी पूर्वकल्पना दिल्यास प्रशासन आणि नागरिक दोघांचीही सोय झाली असती, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
एकीकडे भाजीविक्रेत्यांचे ठाण मांडणे, दुसरीकडे अरुंद रस्त्यांतून वाहने दामटणे, लहानशा गल्लीमध्ये किंवा मार्गावर चारचाकीमुळे वाहतूक कोंडी होणे याला समस्त बेळगावकर वैतागले आहेत. आता शहरात वाहन चालविणे हे कसरतीचे काम झाले आहे. त्यातच मोकाट जनावरांचा प्रश्न नेहमीचाच आहे. शहरातील वाहनांची संख्या अलीकडच्या दोन वर्षांत प्रचंड संख्येने वाढली. प्रत्येक घरी दोन ते तीन दुचाकी व एक तरी चारचाकी वाहन पहायला मिळतेच. तथापि, अपार्टमेंट्स बांधताना पार्किंगसाठीची जागा सोडणे आवश्यक आहे. परंतु, प्रत्येकजणच ती उपलब्ध करून देईल, असे नाही. वाहने वाढल्याने अपार्टमेंटमध्येही पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुसरीकडे महानगरपालिका जेव्हा अशा मोठ्या आस्थापनांना परवानगी देते, तेव्हा पार्किंगचा प्रश्न प्रथम विचारात घ्यायला हवा. आज जरी त्याबाबत गांभीर्याने विचार होत असला तरी तो पूर्वी झालेला नाही. त्यामुळे पार्किंगच्या जागेमध्ये अर्थात बेसमेंटमध्ये विविध दुकानांना व छोट्या व्यावसायिकांना परवाने दिल्याने पार्किंगसाठी जागाच राहिली नाही. त्यामुळे वाहनधारकांनासुद्धा नाईलाजाने का होईना रस्त्यावरच वाहने पार्क करावी लागत आहेत. मात्र, कोणताही उत्सव आला, राष्ट्रीय विशेष दिनांचे आयोजन असले की मार्ग बदलायचा एवढेच प्रशासनाच्या हातात राहिले आहे. आता दिवाळीच्या अनुषंगाने पुन्हा ठिकठिकाणी बॅरिकेड्स घालून रस्ते अडविण्यात आले आहेत. संभाजी चौकातून किर्लोस्कर रोड मार्गे जाण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. यंदे खुटातून समादेवी गल्लीकडे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्ण वळसा घालून येण्याशिवाय वाहनचालकांना पर्याय राहिलेला नाही.
पुन्हा नागरिकांच्या किंवा वाहनचालकांच्या सोयीच्यादृष्टीने शहरात कोणत्याच योजना होत नाहीत. अचानक मोहीम राबवून भाजीविक्रेत्यांना, फेरीवाल्यांना हटवण्याची मोहीम हाती घेतली जाते. दोन दिवस मोहिमेचा फार्स होतो. पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे कोणत्याही प्रश्नावर तात्पुरती मलमपट्टी एवढेच प्रशासनाला जमते आणि नागरिकांनाही ते सहन करावे लागते. मुळात सामान्य माणसांची सहनशीलता ही प्रश्न अधिकाधिक बिकट करते, हे वास्तव अजूनही बेळगावकरांच्या लक्षात येत नाही, तोपर्यंत प्रशासन असेच वेठीला धरत राहणार. सोमवारी झालेल्या अचानक बदलामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बॅरिकेड्स हटवून दुचाकी पुढे दामटण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा कायमस्वरुपी उपाय नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
रस्ता बंद करण्यास नागरिकांचा विरोध
वाहतूक नियंत्रित करण्यासाठी, गर्दी टाळण्यासाठी चारचाकी किंवा दुचाकी वाहनांना निर्बंध करणे याबद्दल तक्रार नाहीच. परंतु, सातत्याने कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करणे याला नागरिकांचा विरोध आहे. याबाबत सातत्याने प्रशासनाशी संपर्क साधून पूर्वप्रसिद्धीस एक पत्रक द्यावे, जेणेकरून नागरिकांना मार्गातील बदलाची कल्पना येईल, असे वारंवार सुचवूनदेखील काहीही उपाययोजना होत नाही.