उमदी येथे अवकाळी नुकसान भरपाईसाठी ठिय्या आंदोलन; प्राणांतिक उपोषणाचा इशारा
उमदी प्रतिनिधी
उमदी मंडल मधील द्राक्ष व डाळिंब बागायतदारांना अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई १५ दिवसांत शासनाने खात्यांवर जमा नाही केली व जर आचारसंहिताही लागू झाली तरी पण प्रांत कार्यालयासमोर प्राणांकित उपोषण करू असा इशारा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष पोतदार यांनी ठिय्या आंदोलन प्रसंगी बोलताना दिला. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी उमदी येथे पाणी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व पक्षीय नेते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष पोतदार यांनी जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानामुळे द्राक्ष व डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाच्या सर्व कर्मचारी यांनी नुकसानीचा पंचनामा करून शासनदरबारी पाठवला आहे यांची दखल घेऊन तातडीने नुकसान भरपाई खात्यांवर जमा करावी अशी मागणी केली.
पाणी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अनिल शिंदे म्हणाले की, पाण्याच्या तीव्र टंचाईने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. कृषी खात्याकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा देखील करण्यात आला. मात्र पंचनामा करून महिना झाला तरी अद्याप भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलन करण्यास भाग न पाडता नुकसान भरपाई द्यावी.
मंडल अधिकारी एम.व्ही.खोत व कृषी सहाय्यक सचिन काटकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते निवृत्ती शिंदे, युवा नेते तानाजी मोरे, माजी उपसरपंच रमेश हळके, बाबु सावंत, गोपाल माळी, आप्पु कोरे, बाबु वाघदरी, केशव पाटील, मोनाप्पा सुतार, अनिल शिंदे, लक्ष्मण कोळी, अक्षय भोसले, गुडां माने, रियाज शेख सह मान्यवर उपस्थित होते.