मराठी शाळेतील स्थलांतर त्वरित थांबवा
वडगाव-परिसरातील नागरिकांचे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : कन्नड शाळा स्थलांतरास तीव्र विरोध
बेळगाव : राजवाडा कंपाऊंड, वडगाव येथील मराठी शाळा क्र. 31 व मराठी मुलींची शाळा क्र. 33 या शाळेमध्ये इतर ठिकाणची कन्नड शाळा भरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे मराठीसह कन्नड भाषिक विद्यार्थ्यांचेही नुकसान होणार आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कन्नड माध्यम शाळेसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी व मराठी शाळेत होणारे हे स्थलांतर तात्काळ थांबवावे, अशा मागणीचे निवेदन मराठी भाषिकांतर्फे बुधवारी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.
देवांगनगर येथील कन्नड शाळेला इमारत उपलब्ध नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात या शाळेचे काही वर्ग 31 नंबर मराठी शाळेत हलविण्यात आले होते. दोन वर्षांपासून या ठिकाणी वर्ग सुरू असताना आता कायमस्वरुपी वर्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मागील दोन दिवसांत या ठिकाणी बेंचदेखील आणण्यात आले आहेत. कायमस्वरुपी शाळा सुरू झाल्यास मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना जागा अपुरी पडणार आहे. 31 नंबर शाळेत शंभर तर मुलींच्या शाळेत 170 हून अधिक पटसंख्या असल्याने भविष्यात विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे.
मंगळवारी वडगाव परिसरातील काही पालकांनी कन्नड शाळेच्या स्थलांतराला विरोध दर्शविला. मराठी शाळेत स्थलांतर करण्याऐवजी कोणत्याही इतर सरकारी इमारतीत शाळेचे स्थलांतर करण्याची मागणी करण्यात आली. बुधवारी वडगावसह परिसरातील मराठी भाषिक नागरिकांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हा शिक्षणाधिकारी सरकारी कार्यक्रमात असल्याने त्यांच्या साहाय्यकांनी निवेदन स्वीकारून आपण जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदन पोहोचवू, असे आश्वासन दिले. कन्नड शाळेचे स्थलांतर न रोखल्यास येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलनाचा इशारा मराठी भाषिकांनी दिला आहे. यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, नेताजी जाधव, म. ए. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, कीर्तीकुमार कुलकर्णी यांसह इतर नागरिक उपस्थित होते.