कॅनडात खलिस्तानी दहशतवाद रोखा
अमेरिकेत हिंदूंच सुरक्षेवरून मोठी निदर्शने
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीत भारतीय वंशाच्या लोकांनी कॅनडा आणि बांगलादेशात हिंदूंविरोधात होत असलेल्या हिंसेच्या विरोधात एकजूटता दाखवत एक रॅली काढली आहे. मिलपिटास सिटी हॉलमध्sय मोठ्या संख्येत भारतीय अमेरिकन्सच्या एका सभेला संबोधित करत समुदायाच्या नेत्यांनी हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांची निंदा केली आहे. समूहाकडून मानवाधिकारांच्या उल्लंघनाची निंदा आणि कॅनडा तसेच बांगलादेश सरकारला स्वत:च्या हिंदू लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी उत्तरदायी ठरविण्याचे आवाहन अमेरिकेला करण्यात आले आहे. तर रॅलीत लोकांनी ‘खलिस्तानी दहशतवाद रोखा, कॅनडातील हिंदूंचे रक्षण करा, बांगलादेशी हिंदूंचे रक्षण करा’ अशा घोषणा दिल्या आहेत.
भारतीयांनी ब्रॅम्पटन येथे हिंदू सभा मंदिरात हिंदू भाविकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी निराशा व्यक्त केली आहे. मागील महिन्यात कॅनडाच्या ब्रॅम्पटन येथे खलिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदूंवर हल्ले केले होते. खलिस्तानी दहशतवादी मंदिर परिसरात शिरून पुरुष, महिला आणि मुलांना मारहाण करत असल्याचे आम्ही पाहिले आहे. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी गेलेल्या हिंदूंना गुंडांकडून भयंकर त्रास देण्यात आला होता. पोलिसांची खलिस्तान समर्थकांना साथ मिळाली होती. कॅनडात हिंसेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या स्वरुपात सादर केले जात आहे. कॅनडाच्या हिंदूंच्या मूलभूत मानवाधिकारांचे रक्षण करण्यात ट्रुडो सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे अमेरिकेतील हिंदू समुदायाने पत्रक जारी करत म्हटले आहे.
सिलिकॉन व्हॅलीच्या परिसरात 2 लाखाहून अधिक भारतीयांचे वास्तव्य आहे. अमेरिकन्स फॉर हिंदूंजचे डॉ. रमेश जापरा यांनी कॅनडातील हिंदूंवर खलिस्तानी तर बांगलादेशात कट्टरवादी समुहांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांची निंदा केली आहे. अमेरिकेतील हिंदूंच्या संघटनेच्या पदाधिकारी पुष्पिता प्रसाद यांनीही कॅनडात शीख फॉर जस्टिसकडुन हिंदूंना लक्ष्य करण्यात आल्याप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे.