For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्जवसुलीचा तगादा लावणाऱ्यांना त्वरित आवरा!

10:31 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्जवसुलीचा तगादा लावणाऱ्यांना त्वरित आवरा
Advertisement

विविध शेतकरी संघटनांचे मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे. कर्जवसुलीला येणाऱ्या आर्थिक संस्था व बँकांच्या अधिकाऱ्यांना रोखण्यात यावे. जिल्ह्यातील अथणी, रायबाग, रामदुर्ग तालुक्यांमध्ये पाण्याची दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून त्वरित पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी. जनावरांना चारा उपलब्ध करावा, अशा विविध मागण्यांसाठी विविध शेतकरी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. पोलीस व शेतकऱ्यांमध्ये वादावादी झाल्यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेवून निवेदन स्वीकारले. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिकरित्या संकटात सापडला आहे. पिकहानी देण्यात आली नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. असे असताना कर्जवसुलीसाठी आर्थिक संस्थांकडून तगादा लावला जात आहे. ही प्रक्रिया त्वरित थांबविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये बँक अधिकाऱ्यांची बैठक घेवून कर्जवसुली करू नये, अशी सूचना करण्यात आली आहे. असे असतानाही इतर आर्थिक संस्थांकडून कर्जवसुली करण्यात येत आहे. फायनान्सकडून शेतकऱ्यांना धमकावले जात आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

तसेच अथणी, रायबाग आदी तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी आवश्यक प्रमाणात पाणी मिळत नाही. तसेच वीजपुरवठाही सुरळीत केला जात नसल्याने संकटात भर पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी मिळणेही कठीण झाले आहे. यासाठी त्वरित 24 तास वीजपुरवठा करण्यात यावा व पाण्यासाठी घटप्रभा कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेवून घटप्रभा कालव्याच्या माध्यमातून पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रादेशिक आयुक्तांकडून पाणी सोडण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, असे सांगितले. तर हेस्कॉम अधिकाऱ्यांना संबंधित तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आवश्यक वेळेत वीजपुरवठा करण्याची सूचना केली. तर आर्थिक संस्थांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, यासाठी नोटीस जारी केली जाईल, असे सांगितले. याबरोबरच 24 टक्क्यापेक्षा अधिक व्याजदर आकारणाऱ्यांची माहिती दिल्यास संबंधितांना नोटीस देवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. यावेळी शेतकरी नेते प्रकाश नाईक, चुन्नाप्पा पुजारी, कलगौडा पाटील, प्रकाश लोहार, वैजु लुम्याचे, बसनगौडा पाटील आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.