For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘स्टॉप क्लॉक’ नियम आता ‘टी-20’, ‘वनडे‘त कायमस्वरुपी

06:45 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘स्टॉप क्लॉक’ नियम आता ‘टी 20’  ‘वनडे‘त कायमस्वरुपी
Advertisement

आयसीसीच्या बैठकीत निर्णय, येत्या ‘टी-20’ विश्वचषकापासून लागू होणार नियम

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

‘स्टॉप क्लॉक सिस्टम’, जी सध्या चाचणी तत्त्वावर वापली जात आहे ती आगामी टी-20 विश्वचषकापासून सर्व पूर्ण सदस्यांकडून खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 लढतींचे कायमस्वरूपी वैशिष्ट्या बनवले जाईल, असे आयसीसीने शुक्रवारी घोषित केले आहे. ‘आयसीसी’ने डिसेंबर, 2023 मध्ये ‘स्टॉप क्लॉक’ नियम लागू केला होता आणि तो 1 जून, 2024 पासून प्रचलित असलेल्या खेळाच्या नियमांत समाविष्ट होईल.

Advertisement

जून, 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. तेव्हापासून खेळविल्या जाणाऱ्या ‘आयसीसी’च्या सर्व एकदिवसीय व ‘टी-20’ लढतींकरिता ‘स्टॉप क्लॉक’ नियम हा कायमस्वरुपी राहणार आहे, असे वार्षिक मंडळ बैठकीनंतर ‘आयसीसी’कडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

या नियमाची चाचणी एप्रिल, 2024 पर्यंत चालवायची होती. परंतु या प्रयोगाने सामने वेळेवर पूर्ण करण्याच्या दृष्टीने आधीच निकाल दिले आहेत. या नियमामुळे प्रत्येक एकदिवसीय सामन्यात अंदाजे 20 मिनिटांची बचत झाली आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. या नियमानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एक षटक पूर्ण झाल्यानंतर 60 सेकंदांत नवीन षटक सुरू करावे लागेल. 60 ते 0 अशी मोजणी करणारे एक इलेक्ट्रॉनिक घड्याळ मैदानावर दिसेल आणि तिसरा पंच या घड्याळाची सुऊवात कधी करायची ते ठरवू शकेल.

एक षटक संपल्यानंतर पुढील षटकाचा पहिला चेंडू निर्धारित 60 सेकंदांत टाकण्यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अपयश आल्यास दोन वेळा इशारे देण्यात येतील आणि त्यानंतर उल्लंघन झाल्यास प्रत्येक घटनेमागे पाच धावांचा दंड आकारला जाईल. तथापि, आयसीसीने नियमाला काही अपवाद देखील दिले आहेत. घड्याळ जर आधीच सुरू केलेले असेल, तर अशा परिस्थितीत ते रद्द केले जाऊ शकते. त्याशिवाय षटकांच्या दरम्यान नवीन फलंदाज क्रीझवर येणे,  अधिकृत ड्रिंक्स ब्रेक किंवा फलंदाज वा क्षेत्ररक्षकाला दुखापत होऊन त्याच्यावर मैदानात उपचार करावे लागणे यांना अपवाद ठरविलेले आहे.

आयसीसीच्या बैठकीत टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी (27 जून) आणि अंतिम फेरीसाठी (29 जून) राखीव दिवस ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.