हैदराबादचा पंजाबवर सहज विजय
औपचारिक सामन्यात चार गडी राखून मात : सामनावीर अभिषेक शर्माच्या 28 चेंडूत 66 धावा
वृत्तसंस्था/ हैदराबाद
सनरायजर्स हैदराबादने आयपीएलमधील अखेरच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्सचा चार विकेटने पराभव केला. पंजाबने दिलेले 215 धावांचे आव्हान हैदराबादने सहा विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. हैदराबादने या विजयासह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. केकेआरविरुद्ध राजस्थानचा पराभव झाल्यास हैदराबाद संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर कायम राहणार आहे. दरम्यान, पंजाबचा यंदाच्या आयपीएल हंगामाचा शेवट पराभवाने झाले. पंजाब किंग्सला 14 सामन्यात 10 गुणांची कमाई करता आली.
पंजाबने दिलेल्या 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. अर्शदीप सिंहने पहिल्याच चेंडूवर ट्रेविस हेडला बाद केले. हेडला भोपळाही फोडता आला नाही.
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक
अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांनी पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेताना चौफेर फटकेबाजी केली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. हर्षल पटेलने राहुल त्रिपाठीला बाद करत ही जोडी फोडली. त्रिपाठीने 18 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारासह 33 धावा केल्या. त्रिपाठी बाद झाल्यानंतर अभिषेकने नितीश रे•ाrला सोबतीला घेत अर्धशतकी भागीदारी साकारली. अभिषेकने 28 चेंडूत 5 चौकार व 6 षटकारासह 66 धावांची आक्रमक खेळी केली. त्याला शशांक सिंगने बाद केले. यानंतर नितीश रे•ाrने 25 चेंडूत 37 धावांचे योगदान दिले तर अहमद 3 धावा काढून बाद झाला. यानंतर हेन्रिक क्लासेनने अब्दुल समादच्या साथीने विजय आवाक्यात आणला. क्लासेन चुकीचा फटका मारुन बाद झाला. त्याने 26 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये दोन षटकार आणि तीन चौकार ठोकले. यानंतर अब्दुल समद आणि सनवीर यांनी अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले. अब्दुल समद 11 तर सनवीर 6 धावांवर नाबाद राहिले. हैदराबादने विजयी लक्ष्य 19,1 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. पंजाबकडून अर्शदीप व हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
पंजाबचा पराभवाने शेवट
येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शिखर धवन व सॅम करनच्या अनुपस्थितीत जितेश शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचे सलामी फलंदाज अथर्व तायडे आणि प्रभसिमरन यांनी वादळी सुरुवात केली. या दोघांनी हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. अथर्व तायडेने 27 चेंडूमध्ये 46 धावांचा पाऊस पाडला. त्याचे अर्धशतक फक्त चार धावांनी हुकले. विदर्भाच्या तायडेने आपल्या खळीमध्ये दोन षटकार आणि पाच चौकार ठोकले. नटराजनने तायडेला बाद करत हैदराबादला पहिले यश मिळवून दिले.
प्रभसिमरन, रॉस्यू, जितेश शर्माची फटकेबाजी
प्रभसमिरन आणि रॉस्यू यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. प्रभसिमरनने 45 चेंडूमध्ये 71 धावा केल्या. आपल्या खेळीमध्ये चार षटकार आणि सात चौकार ठोकले. रॉस्यूने 24 चेंडूत 49 धावांची आक्रमक खेळी केली. ही जोडी बाद झाल्यानंतर शशांक सिंह दोन धावा काढून धावबाद झाला. तर आशुतोष शर्मा मोठा फटका मारण्याच्या नादात दोन धावांवर बाद झाला. कर्णधार जितेश शर्माने मात्र 15 चेंडूत नाबाद 32 धावा करत संघाला दोनशेचा टप्पा गाठून दिला. शिवम सिंह 2 धावांवर नाबाद राहिला. प्रभसिमरन, रॉस्यू, जितेश शर्माच्या शानदार खेळीच्या जोरावर पंजाबने 20 षटकांत 5 बाद 214 धावा केल्या. हैदराबादकडून नटराजनने सर्वाधिक 2 गडी बाद केले तर कमिन्स व वैशाखने प्रत्येकी एका गड्याला तंबूत पाठवले.
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्स 20 षटकांत 5 बाद 214 (अथर्व तायडे 46, प्रभसिमरन सिंग 45 चेंडूत 7 चौकार व 4 षटकारासह 71, रॉस्यू 49, शशांक सिंग 2, जितेश शर्मा 15 चेंडूत नाबाद 32, आशुतोष शर्मा 2, शिवम सिंग नाबाद 2, नटराजन 2 बळी, पॅट कमिन्स व वैशाख प्रत्येकी एक बळी).
सनरायजर्स हैदराबाद 19.1 षटकांत 6 बाद 215 (अभिषेक शर्मा 28 चेंडूत 66, राहुल त्रिपाठी 33, नितीश रे•ाr 37, क्लासेन 42, समद नाबाद 11, सान्विर सिंग नाबाद 6, अर्शदीप सिंग व हर्षल पटेल प्रत्येकी दोन बळी, हरप्रीत ब्रार व शशांक सिंग प्रत्येकी एक बळी).