Sangli | आमदार नायकवडी यांच्या ताफ्यातील वाहनावर दगडफेक
आमदार नायकवडींच्या ताफ्यातील वाहनाचे नुकसान
मिरज : राष्ट्रवादीच्या 'आमदार आपल्या दारी' अभियानांतर्गत दौऱ्यासाठी गेलेल्या आमदार इद्रीस नायकवडी यांच्या ताफ्यातील एका वाहनावर दगडफेक झाल्याची घटना जानराववाडी येथे घडली. सुदैवाने आमदार नायकवडी दुसऱ्या वाहनात होते. मात्र, या घटनेने राजकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे. याबाबत नायकवडी यांनी मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अजित सिद यांना दूरध्वनीवरुन माहिती दिली.
सायंकाळनंतर अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला. हल्लेखोराच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे. कोणीतरी खोडसाळपणाने दगडफेक केल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे राज्यात आमदार आपल्या दारी अभियान सुरु आहे. याअंतर्गत आमदार नायकवडी मिरज ग्रामीण भागाचा दौरा करीत आहेत. गुरुवारी ते जानराववाडी गावाकडे दौऱ्यासाठी गेले होते.
तत्पूर्वी सरपंच भारत कुंडले यांच्या घरी सदिच्छा भेट घेतल्यानंतर त्यांचा ताफा जानराववाडी रस्त्याने दुसऱ्या गावाकडे मार्गस्थ होत होता.याचवेळी अज्ञाताने त्यांच्या ताफ्यातील चारचाकी वाहनावर दगडफेक केली. सुदैवाने नायकवडी व माजीमंत्री अजितराव घोरपडे पुढे गेले होते. मागून अन्य पदाधिकाऱ्यांचे वाहन येत होते. त्याच वाहनावर दगडफेक केली. सदर दगडफेकीत मागील काचा फुटल्या. वाहनात असलेले पदाधिकारी महादेव दबडे यांनी मागे वळून बघितले असता, संबंधीत व्यक्ती पळून गेला असल्याचे सांगण्यात आले.
यानंतर पदाधिकाऱ्यांनी नायकवडी यांना दूरध्वनी करून माहिती दिली. नायकवडी यांनी वाहनाची पाहणी करून मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अजित सिद यांना माहिती दिली. दगडफेक करणारे दोघे अनोळखी असल्याचे सांगितले. तातडीने गुन्हा दाखल करून संशयितांचा शोध घ्यावा, असे निर्देश त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले. परिसरातील सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, ही दगडफेक पूर्व नियोजित असल्याचा संशय व्यक्त होत आहे मात्र राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिलानाही. कोणी तरी खोडसाळपणाने कृत्य केल्याचा संशय असून, पोलीस तक्रार दिली आहे. त्यानुसार योग्य ती कारवाई करतील, असे त्यांनी सांगितले.
या घटनेने राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच नायकवडी यांनी जनावरांच्या बेकायदेशीर करालीबाबत वक्तव्य केले होते. त्यांनीच पुन्हा पत्रकार बैठक घेत आपण कोणाच्याही धमक्यांना घाबरत नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आणि आता त्यांच्या ताफ्यातील वाहनावर दगडफेकीची घटना पडल्याने ही दगडफेक पूर्वनियोजित कटाचा भाग होती का? असा संशय व्यक्त केला जात आहे.