इंग्रजी नामफलक असलेल्या कॅम्प येथील स्वीट मार्टवर कन्नडिगांकडून दगडफेक
कन्नड भाषेतील फलक लावण्यासाठी दांडगाई : व्यावसायिकांतून संताप
बेळगाव : एकीकडे महानगरपालिकेकडून व्यापारी आस्थापनांबाहेरील मराठी व इंग्रजी भाषेतील अक्षरांवर ब्रश फिरविण्याचे काम सुरू आहे तर दुसरीकडे कायदा हातात घेत कन्नड संघटनांनी हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी दुपारी कॅम्प येथील एका नामांकित स्वीट मार्टवरील इंग्रजी भाषेत लिहिण्यात आलेला नामफलक हटविण्यासाठी दादागिरी करण्यात आली. इतकेच नव्हे तर पोलिसांच्या समक्षच कन्नडिगांनी दगडफेक करून नामफलकाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या आदेशानुसार व्यापारी आस्थापनाबाहेरील नामफलकावर 60 टक्के जागेत कन्नड अक्षरे तर उर्वरित 40 टक्के जागेत अन्य भाषेतील अक्षरे लिहिण्याचा फतवा काढण्यात आला आहे. त्यानुसार बहुतांश व्यावसायिकांनी आस्थापनाबाहेरील फलकांवर तिन्ही भाषेतील अक्षरे लिहिली आहेत. मात्र, त्यालाही महानगरपालिका तसेच कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आक्षेप घेतला जात आहे. संबंधितांना कायदेशीर नोटीस देऊन कारवाई करणे गरजेचे आहे.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कन्नड संघटनांचे कार्यकर्ते दुकानदारांवर दादागिरी करत फलक हटवत आहेत. मात्र, त्यांना पोलीस खात्याकडून समज देण्याऐवजी उलट संरक्षण दिले जात आहे. 1 नोव्हेंबरच्या पार्श्वभूमीवर स्वत: मनपा आयुक्त शुभा बी. यांनी राज्योत्सव मिरवणूक निघणाऱ्या मार्गावरील मराठी व इंग्रजी भाषेतील अक्षरांवर रंग फासला होता. या कारवाईमुळे अन्य भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच शनिवारी दुपारी कॅम्प येथील एका नामांकित स्वीट मार्टवरील इंग्रजी भाषेतील नामफलक काढण्यासाठी संबंधित मालकावर मूठभर कन्नड कार्यकर्त्यांनी दांडगाई करण्याचा प्रयत्न केला. मालकाने नामफलक बदलण्यास काही दिवसांची मुदत मागितली. मात्र, त्याला आक्षेप घेत कन्नडिगांनी स्वीट मार्टवर दडगफेक केली. त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या कॅम्प पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. फलकांच्या कारणावरून शहरातील व्यावसायिकांना मनपा व कन्नडिग वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे व्यावसायिकातून तीव्र संताप पसरला आहे. शनिवारी दुपारी कन्नडिगांनी केलेल्या आगळीकीचा व्हिडिओ रविवारी सकाळी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. त्यामुळे सर्वत्र हा चर्चेचा विषय बनला आहे.