संदल मिरवणुकीवेळी दगडफेक
खडक गल्ली परिसरातील घटना, घोषणाबाजीमुळे तणाव
बेळगाव : संदल मिरवणुकीदरम्यान झालेल्या घोषणाबाजीनंतर दगडफेक करण्यात आली आहे. खडक गल्ली परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, पोलीस उपायुक्त नारायण बरमणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. काकतीवेस परिसरात शुक्रवारी उरुसचा कार्यक्रम होता. रात्री काकतीवेसहून दरबार गल्लीकडे संदल मिरवणूक जात होती. ऐनवेळेला मिरवणुकीचा मार्ग बदलण्यात आला. खडक गल्ली परिसरात येताच घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर दगडफेकीची घटना घडली आहे. ऐनवेळेला मिरवणूक मार्ग बदलण्यात आला. मिरवणुकीबरोबर पोलीसही होते. मात्र त्यांची संख्या कमी होती. दगडफेकीत कोणालाही इजा पोहोचली नाही. शनिवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. पोलीस यंत्रणा बंदोबस्तात गुंतलेली असतानाच दगडफेकीची घटना घडली आहे. रात्री काकतीवेस, खडक गल्ली, दरबार गल्ली परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून कारवाई करणार
या घटनेसंबंधी पोलीस आयुक्तांनी रात्री उशिरा पत्रकारांना माहिती दिली आहे. एका धर्मियांच्या मिरवणुकीवेळी काही तरुणांनी खडक गल्लीत घुसून घोषणाबाजी केली. त्यावेळी दोन्ही धर्मातील प्रमुखांनी ही वादावादी मिटविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दगडफेकीची घटना घडली आहे. दगडफेकीत कोणालाही इजा पोहोचली नाही. सीसीटीव्ही फुटेजवरून दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सांगितले.