घस्टोळी क्रॉसजवळ चोरटे हस्तिदंत जप्त
तिघा जणांना अटक, खानापूर तालुक्यात वन्यजीवांची शिकार सुरूच
बेळगाव : खानापूर तालुक्यातील घस्टोळी क्रॉसजवळ हस्तिदंत विक्रीसाठी आलेल्या तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी जिल्हा सीईएनच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून हस्तिदंताचे सात तुकडे जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जिल्हा सीईएनचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर, उपनिरीक्षक आनंद, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टी. के. कोळची, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. एच. बजंत्री, जयराम, एन. आर. गड्याप्पन्नावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
याप्रकरणी जोयडा व खानापूर तालुक्यातील तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. संजय शामराव गवाळकर, राहणार सीतावाडा-रामनगर, ता. जोयडा, जाफर बाबू गुंडोळ्ळी, बसवराज ऊर्फ अभिषेक रवी वड्डर दोघेही राहणार भुरुणकी, ता. खानापूर अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून शुक्रवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. वन्यजीवांची तस्करी व त्यांच्या अवयवांची विक्री करण्याचे प्रकार थोपवण्यासाठी वनखात्याबरोबरच पोलीस दलही सक्रिय आहे. हस्तिदंताची विक्री करण्यासाठी तिघे जण घस्टोळी क्रॉसजवळ आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अचानक छापा टाकून त्या तिघांना अटक केली आहे. हस्तिदंताचे सात तुकडे करून त्यांची विक्री करण्यात येत होती.