माझा चेहराच चोरला
महिलेचा धक्कादायक दावा : औषध कंपनीवर भडकली
एका महिलेसोबत असे काही घडले आहे, जे कुणासोबतही घडू शकते. वाढत्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत लोकांसाठी धोका देखील वाढत आहे. एका महिलेने शेअर केलेली कहाणी सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. या महिलेने एका कंपनीवर स्वत:चा चेहराच चोरल्याचा आरोप केला आहे. याकरता कंपनीने तिची परवानगी घेतली नव्हती. महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंबंधीची माहिती दिली आहे. पुरुषांसाठी औषधे तयार करणाऱ्या कंपनीने स्वत:च्या गोळ्यांच्या जाहिरातीसाठी आपला चेहरा चोरल्याचे महिलेने सांगितले आहे.
मिशेल जेन्स नावाच्या या महिलेने स्वत:ची डीपफेक जाहिरात पाहिल्याचे म्हटले आहे. ही जाहिरात एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ 1.2 दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. एआयने माझे लुक्स चोरले आणि गुप्तरोगाच्या गोळ्यांचा प्रचार करण्यासाठी माझी एक डीपफेक जाहिरात तयार केली असल्याचे मिशेलचे सांगणे आहे. तसेच तिने एआयनिर्मित जाहिरातीचा एक हिस्सा शेअर केला आहे. यात महिलेने (मिशेलचे डीपफेक रुप) स्वत:च्या साथीदाराविषयी एक कहाणी शेअर केल्याचे दिसून येते.
काय असली आहे आणि काय नकली हे समाजाला सांगण्यास आम्ही सक्षम असू शकत नाही. कारण प्रत्येकवेळी तंत्रज्ञानामुळे या गोष्टी अधिकाधिक खऱ्या वाटू लागतात. डीपफेकमध्ये दिसणारा माणूस खरा असत नाही, परंतु तो खऱ्याखुऱ्या माणसाप्रमाणेच बोलत असतो. हा खरा माणूस आहे का त्याचे डीपफेक रुप हे कुणालाच समजू शकत नसल्याचे मिशेलने म्हटले आहे. मिशेलच्या पोस्टरव अनेक लोकांनी कॉमेंट केली आहे. तसेच लोकांनी तिला कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. तर एआयचे साइड इफेक्ट देखील असल्याचे काही लोकांनी म्हटले आहे.