पर्थवर स्टार्कनंतर स्टोक्सचे वादळ
पहिल्याच दिवशी 19 विकेट्स : स्टार्कचे 58 धावांत 7 तर बेन स्टोक्सचाही ‘पंच’
वृत्तसंस्था/ पर्थ
अॅशेस मालिकेतील पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला. पर्थच्या खेळपट्टीवर पहिल्याच दिवशी 19 विकेट्स पडल्या. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि इंग्लंडच्या बेन स्टोक्सच्या वेगवान माऱ्यासमोर दोन्ही संघांचे फलंदाज अपयशी ठरले. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 172 धावांवर बाद झाला. यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी देखील प्रभावी मारा करत ऑस्ट्रेलियाची अवस्था पहिल्या दिवसअखेर 9 बाद 123 अशी केली आहे. यजमान संघ अद्याप 49 धावांनी पिछाडीवर असून नॅथन लियॉन 9 धावांवर खेळत आहे.
प्रारंभी, इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लिश संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. डावातील पहिल्याच षटकांत झॅक क्रॉलीला स्टार्कने खातेही खोलू दिले नाही. यानंतर बेन डकेट आणि ओली पोपने दुसऱ्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. ही जोडी जमलेली असतानाच डकेटला 21 धावांवर स्टार्कने माघारी पाठवले. त्यानंतर आलेल्या जो रूटकडून अपेक्षा होत्या, मात्र त्यालाही खाते खोलता आले नाही.
स्टार्कच्या माऱ्यासमोर इंग्लंडची दाणादाण
सलामीचे तीनही फलंदाज बाद झाल्यानंतर चौथ्या विकेटसाठी ओली पोप आणि हॅरी ब्रूक यांनी 55 धावांची भागीदारी केली. या जोडीने एकेरी-दुहेरी धावांवर भर देत संघाचा धावफलक हलता ठेवला. पण, कॅमरुन ग्रीनच्या एका अफलातून चेंडूवर पोप 46 धावांवर असताना बाद झाला. कर्णधार बेन स्टोक्स काही खास करेल अशी अपेक्षा होती, पण तोही स्वस्तात बाद झाला. हॅरी ब्रूकने मात्र संयमी आणि सर्वाधिक 61 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 52 धावांची खेळी साकारली. याशिवाय, जेमी स्मिथने 22 चेंडूत 6 चौकारासह 33 धावा फटकावल्या. इतर फलंदाज मात्र स्टार्कच्या माऱ्यासमोर टिकाव धरु शकले नाहीत. गस एगकिनसन 1, ब्रायडन कार्स 6 आणि मार्क वूड 0 धावांवर बाद झाले. यामुळे इंग्लंडचा पहिला डाव 32.5 षटकांत 172 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 58 धावांत 7 गडी बाद केले. डोगेटने 2 तर कॅमरुन ग्रीनने 1 गडी बाद केला.
कांगारुंचे फलंदाजही ढेपाळले
इंग्लंडला 172 धावांत गुंडाळल्यानंत ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा जोफ्रा आर्चरने डावाच्या पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर जॅक वेदाराल्डला शून्यावर बाद केले. यानंतर अनुभवी मार्नस लाबुशेन (9), कर्णधार स्टीव्ह स्मिथ (17), उस्मान ख्वाजा (2) धावा करत झटपट बाद झाले. यावेळी यजमान संघाची 4 बाद 31 अशी स्थिती झाली होती. ट्रेविस हेड आणि कॅमेरुन ग्रीन यांनी 45 धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रेविस हेड 21 धावा आणि कॅमेरुन ग्रीन 24 धावा करुन बाद झाला. यानंतर अॅलेक्स केरीने 3 चौकारासह 26 धावांचे योगदान दिले तर मिचेल स्टार्कने 12 धावा केल्या. विशेष म्हणजे, इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सच्या वेगवान माऱ्यासोर कांगारुंचे फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याचे पहायला मिळाले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑसी संघाने 39 षटकांत 9 बाद 123 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 23 धावांत 5 बळी घेतले. जोफ्रा आर्चर आणि कार्से यांनी प्रत्येकी दोघांना माघारी पाठवले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव सर्वबाद 172 (बेन डकेट 21, ओली पोप 46, हॅरी ब्रूक 52, जेमी स्मिथ 33, मिचेल स्टार्क 58 धावांत 7 बळी, डोगेट 2 बळी तर कॅमरुन ग्रीन 1 बळी).
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 39 षटकांत 9 बाद 123 (स्टीव्ह स्मिथ 17, ट्रेव्हिस हेड 21, कॅमेरॉन ग्रीन 24, अॅलेक्स केरी 26, मिचेल स्टार्क 12, बेन स्टोक्स 23 धावांत 5 बळी, आर्चर आणि कार्से प्रत्येकी 2 बळी).
मिचेल स्टार्कचा विक्रमांचा धमाका
- मिचेल स्टार्कने पहिल्या स्पेलच्या 6 षटकात 17 धावा देत तीन गडी बाद केले. यानंतर त्याने दुसऱ्या सेशनच्या स्पेलमध्ये आणखी चार विकेट काढल्या. विशेष म्हणजे, स्टार्कने 2011 मध्ये कसोटीत डेब्यू केले होते. या 14 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच कसोटीत 7 विकेट काढल्या आहे. यापूर्वी त्याने 9 धावा देत 6 विकेट काढल्या होत्या.
- पर्थमध्ये कसोटीच्या पहिल्या डावात स्टार्कने 7 बळी घेतले. या कामगिरीमुळे तो घरच्या मैदानावर डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज म्हणून सर्वाधिक वेळा 5 किंवा त्याहून अधिक बळी घेण्याच्या विक्रमात अव्वल स्थानी पोहोचला आहे. यापूर्वी एलन डेव्हिडसन आणि वसीम अक्रम यांनी घरच्या मैदानावर प्रत्येकी 8 वेळा 5 किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला होता. स्टार्कने पर्थ कसोटीतील पहिल्या डावात केलेल्या 7 बळींच्या जोरावर हा विक्रम मोडला.
घरच्या मैदानावर कसोटीत सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारे गोलंदाज
9 - मिचेल स्टार्क, ऑस्ट्रेलिया
8 - एलन डेविडसन, ऑस्ट्रेलिया
8 - वसीम अक्रम, पाकिस्तान
7 - मिचेल जॉन्सन, ऑस्ट्रेलिया.
- दरम्यान, पहिल्या कसोटीत मिचेल स्टार्कने जो रूटची विकेट काढताच अॅशेस मालिकेच्या इतिहासात 100 विकेट पूर्ण केल्या. अॅशेसमध्ये 100 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा 20 वा आणि ऑस्ट्रेलियाचा 13 गोलंदाज ठरला आहे.
अॅशेस मालिकेत प्रथमच पहिल्याच दिवशी 19 विकेट्स
अॅशेस मालिकेच्या मागील 100 वर्षांत प्रथमच असे घडले की कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी 19 विकेट पडल्या. याआधी 1909 मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पहिल्या दिवशी 18 विकेट पडल्या होत्या. तर पर्थमध्ये पहिल्या दिवशी पडलेल्या विकेट्सची ही सर्वाधिक संख्या आहे. याआधी 2024 मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीच्या पहिल्या दिवशी 17 विकेट्स पडल्या होत्या.