स्टोक्स, आर्चर अंतिम कसोटीतून बाहेर
वृत्तसंस्था/ लंडन
दुखापतग्रस्त कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर गुऊवारपासून येथे सुरू होणाऱ्या भारताविऊद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे इंग्लंडने मालिकेतील निर्णायक सामन्यासाठी त्यांच्या अंतिम 11 खेळाडूंच्या संघात तीन बदल केले आहेत. स्टोक्सच्या अनुपस्थितीत ऑली पोप संघाचे नेतृत्व करेल. संघाचे नेतृत्व करताना गोलंदाजीत चांगली कामगिरी केलेला आणि काही महत्त्वाच्या धावांची भर घातलेला स्टोक्स खांद्याच्या दुखापतीमुळे ओव्हलमधील सामन्याला मुकणार आहे, तर आर्चरला चार वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर विश्रांती देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स देखील अंतिम कसोटीला मुकणार असल्याचे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) बुधवारी म्हटले आहे. ‘कर्णधार बेन स्टोक्स उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे उपलब्ध होणार नाही. फिरकी गोलंदाज लियाम डॉसन आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्स हेही खेळणार नाहीत. इंग्लंडने जेकब बेथेलचा समावेश केला आहे, जो सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. सरेचे गोलंदाज गस अॅटकिन्सन आणि जेमी ओव्हरटन यांच्यासह नॉटिंगहॅमशायरचा जलदगती गोलंदाज जोश टंग याचा संघात समावेश करण्यात आला आहे’, असे ईसीबीने म्हटले आहे