For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्टोइनिसची शतकी खेळी ऋतुराजवर ठरली भारी

06:58 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्टोइनिसची शतकी खेळी  ऋतुराजवर ठरली भारी
Advertisement

लखनौचा चेन्नईवर सहा गडी राखून विजय : सामनावीर स्टोइनिसची नाबाद 124 धावांची खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

येथील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सामनावीर मार्क स्टोइनिस (63 चेंडूत नाबाद 124) धमाकेदार खेळीच्या जोरावर लखनौने चेन्नईचा सहा गडी राखून पराभव केला. प्रारंभी, ऋतुराज गायकवाडचे नाबाद शतक व शिवम दुबेच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने 20 षटकांत 4 बाद 210 धावा केल्या. यानंतर लखनौने विजयी आव्हान 19.3 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यातच पूर्ण केले. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या सामन्यात लखनौने चेन्नईला हरवण्याची किमया केली. या विजयासह लखनौचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे तर चेन्नईची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे.

Advertisement

चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 211 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर डी कॉक पहिल्याच षटकात बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर केएल राहुल व मार्क स्टोइनिस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मुस्तफिजूर रेहमानने पाचव्या षटकात राहुलला (16) बाद करत लखनौला मोठा धक्का दिला. दरम्यान, स्टोइनिस व देवदत्त पडिक्कल यांनी अर्धशतकी भागीदारी साकारली. ही जोडी जमलेली असतानाच पडिक्कलला (13) पथिरानाने तंबूचा रस्ता दाखवला. दुसरीकडे स्टोइनिसने मात्र अफलातून खेळी साकारताना नाबाद शतकी खेळी साकारली. त्याने 63 चेंडूत 13 चौकार व 6 षटकारासह नाबाद 124 धावांची खेळी साकारली व संघाला विजय मिळवून दिला. त्याला निकोलस पूरनने 15 चेंडूत 34 व दीपक हुडाने 6 चेंडूत नाबाद 17 धावा करत चांगली साथ दिली.

ऋतुराजची शतकी खेळी वाया

प्रारंभी, लखनौने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईने पहिली विकेट स्वस्तात गमावली. अजिंक्य रहाणे पहिल्याच षटकात अवघ्या चार धावांवर बाद झाला. डॅरेल मिचेलही फार काळ मैदानावर टिकला नाही. 11 धावांवर त्याला यश ठाकूरने तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी 50 धावांत चेन्नईने आपल्या दोन विकेट गमावल्या होत्या. कर्णधार ऋतुराज गायकवाड व रवींद्र जडेजा या दोघांनी 52 धावांची भागीदारी साकारत संघाचे शतक फलकावर लावले. दरम्यान, जडेजाला मोहसीन खानने बाद करत चेन्नईला तिसरा धक्का दिला. जडेजाने 2 चौकारासह 16 धावा फटकावल्या. ऋतुराजने एका बाजूने शानदार फलंदाजी साकारत संघाचा डाव सावरला. त्याला शिवम दुबेने उत्तम साथ दिली. या जोडीने तुफानी फलंदाजी करताना शतकी भागीदारी केली. ऋतुराजने नाबाद शतक झळकावताना 60 चेंडूत 12 चौकार व 3 षटकारासह 108 धावा केल्या. दुबेनेही आक्रमक फलंदाजी करताना अवघ्या 27 चेंडूत 3 चौकार व 7 षटकारासह 66 धावा केल्या. शेवटच्या षटकात दुबे रन आऊट झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या धोनीने चौकार लगावला. ऋतुराज व दुबेच्या या शानदार खेळीच्या जोरावर चेन्नईने 20 षटकांत 4 बाद 210 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक : चेन्नई सुपर किंग्ज 20 षटकांत 4 बाद 210 (अजिंक्य रहाणे 1, ऋतुराज गायकवाड 60 चेंडूत नाबाद 108, डॅरेल मिचेल 11, रवींद्र जडेजा 16, शिवम दुबे 27 चेंडूत 66, धोनी नाबाद 4, मोहसीन खान, यश ठाकूर व हेन्री प्रत्येकी एक बळी)

लखनौ सुपर जायंट्स 19.3 षटकांत 4 बाद 213 (केएल राहुल 16, मार्क स्टोइनिस 63 चेंडूत 13 चौकार व 6 षटकारासह नाबाद 124, निकोलस पूरन 15 चेंडूत 34, दीपक हुडा 6 चेंडूत नाबाद 17, पथिराना 2 तर दीपक चहर, मुस्तफिजूर रेहमान प्रत्येकी 1 बळी).

ऋतुराजचा अनोखा विक्रम

लखनौविरुद्ध सामन्यात सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाबाद शतकी खेळी साकारली. या शतकाबरोबरच ऋतुराज गायकवाडने सीएसकेचा कर्णधार म्हणून एक मोठा विक्रम देखील आपल्या नावावर केला. आयपीएलमधील ही त्याची दुसरी शतकी खेळी आहे. मात्र चेन्नईचा कर्णधार म्हणून ही त्याची पहिलीच शतकी खेळी आहे. या शतकाबरोबरच ऋतुराजने आयपीएलच्या इतिहासात चेन्नईच्या कर्णधारांना जे जमले नाही ते करून दाखवले. ऋतुराज हा चेन्नई संघाचा शतकी खेळी करणारा पहिला कर्णधार ठरला आहे. यापूर्वी चेन्नईचे कॅप्टनपद भूषवलेल्या महेंद्रसिंह धोनी, जडेजा, सुरेश रैनाला देखील असा कारनामा करता आलेला नाही.

Advertisement
Tags :

.