अखेरच्या क्षणी दबावात शेअर बाजारात घसरण
सेन्सेक्स 167 अंकांनी नुकसानीत : रिलायन्स समभाग घसरला
मुंबई :
अखेरच्या क्षणी विक्रीवर दबाव निर्माण झाल्याने भारतीय शेअर बाजार बुधवारी काहीसा घसरणीसह बंद झाला आहे. एचडीएफसी बँक आणि दिग्गज रिलायन्स इंडस्ट्रिज यांनी बाजारात दबाव निर्माण केला.
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 167 अंकांनी घसरत 81467 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 31 अंकांनी घसरत 24981 अंकांवर बंद झाला होता. बीएसई स्मॉलकॅप 670 अंकांनी वाढत 56,111 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 17 समभाग तेजीत आणि 13 समभाग घसरणीत बंद झाले. तर दुसरीकडे निफ्टी निर्देशांकातील 50 समभागांपैकी 31 समभागांमध्ये घसरण अनुभवायला मिळाली तर 19 समभाग तेजीसह कार्यरत होते. एफएमसीजी आणि आईल अँड गॅस ही क्षेत्रे वगळता तर सर्व क्षेत्रे तेजीत होती.
याचदरम्यान देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 7000 कोटींचे समभाग खरेदी केले असल्याची माहिती आहे. रिलायन्स, आयटीसी, एचडीएफसी बँक, लार्सन टुब्रो यांच्या निराशादायी कामगिरीचा दबाव शेअरबाजारात पाहायला मिळाला. एसबीआय, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक यांनी बाजाराला सावरण्याचे काम केले.
आशियाई बाजारात पाहता जपानचा निक्केई 0.87 टक्के तेजीत होता. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 1.38 टक्के आणि चीनचा शांघाई कम्पोझीट निर्देशांक 6.62 घसरणीसोबत बंद झाले. 8 ऑक्टोबरला अमेरिकेतील डोव्ह जोन्स 0.30 टक्के वाढत आणि नॅसडॅक 1.45 वाढत बंद झाले होते. एनएसईच्या माहितीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी 8 ऑक्टोबरला 5729 कोटींचे समभाग विक्री केले तर यादरम्यान देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 7000 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत.
समभागांची कामगिरी
बाजारात बुधवारी टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, पॉवरग्रिड कॉर्प, इन्फोसिस, टायटन, टीसीएस, सनफार्मा, एशियन पेंटस्, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग तेजीत होते तर दुसरीकडे टाटा स्टील, आयटीसी, नेस्ले इंडिया, रिलायन्स, अदानी पोर्टस्, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा आणि महिंद्रा, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग घसरणीत राहिले होते.