आयटी समभागांमुळे शेअर बाजारात तेजी
सेन्सेक्स 595 अंकांनी मजबूत : टेक महिंद्रा तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आयटी समभागांच्या मजबूत कामगिरीमुळे बुधवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 595 अंकांनी वाढत बंद झाला.बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 595 अंकांनी वाढत 84,466 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 180 अंकांनी मजबूत होत 25,875 च्या स्तरावर बंद झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एफ 1 बी विजा संदर्भात सकारात्मक वक्तव्य केल्याने त्याचा परिणाम आयटी समभागांवर दिसून आला. आशिया बाजारातही सकारात्मक कल होता. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार लवकरच पूर्ण होणार या बातमीने बाजारात सकारात्मक स्थिती दिसून आली. सकाळी सेन्सेक्स 84,238 अंकांवर खुला झाला तर निफ्टी 25,834 वर खुला झाला होता.
बीएसईमधील कंपन्यांच्या कामगिरीकडे पाहता एशियन पेंटस, टेक महिंद्रा आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले होते. दुसरीकडे टाटा स्टील, टाटा मोटर्स पीव्ही आणि बीईएल यांचे समभाग घसरणीमध्ये राहिल्याचे दिसून आले. निफ्टी मिडकॅप-100 निर्देशांक 0.79 टक्के वाढत व स्मॉल कॅप निर्देशांक 0.82 टक्के वाढत बंद झाला. विविध क्षेत्रांची कामगिरी पाहता निफ्टी आयटी निर्देशांक सर्वाधिक 2.04 टक्के वाढत बंद झाला. यानंतर ऑटो आणि फार्मा या निर्देशांकांनी चमकदार कामगिरी केलेली दिसून आली. या निर्देशांकाने अनुक्रमे 1.24 टक्के, 1 टक्का इतकी वाढ नोंदवली होती.
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरती येत्या काही दिवसात अंतिम निर्णय होणार ही बातमी तसेच बिहार विधानसभा निवडणुकीतील एक्झिट पोलमध्ये एनडीएला पुन्हा सत्ता राखता येणार असल्याच्या बातमीने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला. दुसऱ्या तिमाहीमध्ये विविध कंपन्यांचे निकाल मजबूत दिसून आल्याने त्याचाही परिणाम गुंतवणूकदारांवर दिसला.