अखेरच्या दिवशी शेअर बाजारात घसरण
आयटी समभागांमुळे बाजार दबावात : सेन्सेक्स 689 अंकांनी घसरला
वृत्तसंस्था/ मुंबई
अमेरिकेसोबत संभाव्य व्यापार कराराबाबत अनिश्चितता आणि टीसीएसचे तिमाही निकाल कमकुवत या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार शुक्रवारी घसरणीसोबत बंद झाला. सेन्सेक्स 689 अंकांनी तर निफ्टी 205 अंकांनी घसरत बंद झाला.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 689 अंकांच्या घसरणीसोबत 82500 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांकही 205 अंकांनी घसरत 25149 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 201 अंकांनी घसरत 56754 अंकांवर बंद झाला आहे. शेअरबाजार सलग दुसऱ्या आठवड्यात साप्ताहिक आधारावर पाहता घसरणीसोबत बंद झालाय. निफ्टी 50 निर्देशांक एकंदर आठवड्यात (7 ते 11 जुलै) 1.22 टक्के घसरणीत होता. बीएसई सेन्सेक्स 1.12 टक्के इतका कमकुवत झाला. आयटी समभागांच्या कमकुवत कामगिरीमुळे शेअरबाजारात घसरण अनुभवायला मिळाली. टीसीएसचे समभाग शेवटी 3.4 टक्के घसरत बंद झाले होते. यासोबत इन्फोसिस व विप्रो यांचेही समभागही दबावात दिसून आले. शुक्रवारी बाजाराची सुरुवात घसरणीसोबत झाली आणि अखेरपर्यंत बाजार कमकुवतच राहिला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने गुरुवारी तिमाही निकाल जाहीर केले होते, कामगिरी चांगली नसल्याच्या प्रतिक्रीया आल्याने त्याचा परिणाम समभागावर पाहायला मिळाला. या आठवड्यात एकंदर पाहता आयटी क्षेत्राची कामगिरी निराशादायक झाली आहे. 3.8 टक्के इतकी निर्देशांकात घसरण दिसली. अमेरिकेतील व्यापार कराराबाबतची अनिश्चित स्थिती व टीसीएसचे निकाल हे दोन्ही निर्देशांकावर परिणाम करणारे ठरले. याचदरम्यान गुंतवणूकदार सध्या भारत अमेरिका यांच्यातील व्यापार कराराकडे लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे सध्या त्यांनी सावधगिरी बाळगणे इष्ट मानले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर 35 टक्के कर लावला आहे.