शेअर बाजार दुसऱ्या दिवशी तेजीसमवेत बंद
सेन्सेक्स 143 अंकांनी तेजीत, आयटी निर्देशांकाची चमक
मुंबई :
जुलै सिरीज एक्सपायरीच्या एक दिवस आधी भारतीय शेअरबाजार काहीशी तेजी दाखवत बंद झाले आहेत. बुधवारी शेअर बाजारामध्ये आयटी, धातू आणि फार्मा निर्देशांकाने तेजी राखली होती. सलग दुसऱ्या सत्रामध्ये शेअर बाजार तेजीसोबत बंद झाला आहे.
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 143 अंकांनी वाढत 81481 अंकांवर बंद झाला होता तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 33 अंकांनी वाढत 24855 अंकांवर बंद होताना दिसला. विविध क्षेत्रांचा विचार करता आयटी, मेटल आणि फार्मा या क्षेत्राच्या निर्देशांकांनी तेजी दर्शवली होती. तर दुसरीकडे ऑटो, रियल्टी आणि एफएमसीजी निर्देशांकांनी मात्र घसरण दर्शवली होती. फार्मा निर्देशांक सलग सहाव्या सत्रामध्ये तेजीत होता. एफएमसीजी क्षेत्राचा निर्देशांक सलग तिसऱ्या दिवशी तेजीमध्ये पाहायला मिळाला. आयटी निर्देशांकाला तेजी बहाल करण्यामध्ये कोफोर्ज आणि एलटीआय माइंडट्री यांनी साथ दिली होती. रिअॅल्टी निर्देशांक पाहता यामध्ये ब्रिगेड एंटरप्राइजेस व डीएलएफ यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरणीत राहिले होते. शेअरबाजारात बुधवारी गुंतवणूकदारांनी इन्फ्रा आणि एनर्जी कंपन्यांचे समभाग खरेदी करण्यामध्ये रस दाखवला होता.
निफ्टी बँक निर्देशांक 71 अंकांनी घसरत 56151 च्या स्तरावर बंद झाला तर निफ्टी मिडकॅप निर्देशांकसुद्धा 63 अंकांनी घसरून 57942 च्या स्तरावर बंद झाला. विविध समभागांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प यांचे समभाग घसरणीत राहिले होते. यासोबतच पॉवरग्रिड कॉर्प, बजाज ऑटो, इटर्नल, कोल इंडिया यांचे समभाग सुद्धा मोठ्या प्रमाणात घसरणीत राहिले होते. दुसरीकडे तेजीचा विचार करता लार्सन अँड टुब्रो, सनफार्मा, एनटीपीसी, टाटा कंझ्युमर आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग सर्वाधिक तेजीत पाहायला मिळाले. एल अँड टीचे समभाग जूनमधील तिमाही निकालामुळे वाढलेले पाहायला मिळाले. एवेन्यू सुपरमार्टचे समभाग 7 टक्के वाढत बंद झाले.