सोमवारी शेअरबाजार तेजीसह उत्साहात बंद
आयटी, बँकिंग समभाग चमकले, सेन्सेक्स 582 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आयटी आणि बँकिंग समभागांच्या दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार सोमवारी पहिल्या दिवशी चांगल्या तेजीसोबत बंद झाला. सेन्सेक्स 582 अंकांनी वाढत बंद झाला. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 582 अंकांनी वाढत 81790 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 183 अंकांनी वाढीसोबत 25077 अंकांवर बंद झाला होता. बँक निफ्टी निर्देशांक 515 अंकांच्या वधारासह 56104 अंकांवर बंद झाला. तिमाही निकालाचा हंगाम सुरु होण्याआधी आयटी समभागांमध्ये तेजी दिसून आली. यानेच बाजारात तेजीचे वातावरण तयार केले. आशियाई बाजारातही तेजी होती. खासगी बँकांचे समभाग खरेदी करण्यावर गुंतवणूकदारांनी भर दिला होता. यानेही बाजाराला तेजीत ठेवण्यात हातभार लावला. सेन्सेक्स सकाळी खुला झाल्यावर सुरुवातीला चढउतार दिसून आला.
सेन्सेक्समधील टीसीएस, टेक महिंद्रा, इटर्नल, अॅक्सिस बँक आणि बजाज फायनान्स यांचे समभाग सर्वाधिक वाढलेले दिसले. हे समभाग जवळपास 3 टक्यांच्या आसपास वाढले होते. दुसरीकडे ट्रेंट, टाटा स्टील, अदानी पोर्टस, पॉवर ग्रिड कॉर्प व टायटन यांचे समभाग कमकुवत झालेले दिसून आले. क्षेत्रांच्या कामगिरीकडे पाहता आयटी निर्देशांक सर्वाधिक वाढीसोबत बंद झाला. हा निर्देशांक 2.28 टक्के अधिक वाढला होता. यानंतर निफ्टी प्रायव्हेट बँकेचा निर्देशांक, फायनॅन्शीयल सर्व्हिसेस व हेल्थकेअर निर्देशांकही तेजीत राहिले होते. धातू, एफएमसीजी व माध्यम क्षेत्राचे निर्देशांक घसरणीत होते. मिडकॅप100 निर्देशांक 0.89 टक्के व स्मॉलकॅप100 0.28 टक्के वाढत बंद झाला.
जागतिक बाजारातले चित्र
जागतिक बाजारात पाहता निक्केई सर्वाधिक तेजीत राहिला होता. निक्केई 4 टक्के वाढत विक्रमी स्तरावर बंद झाला. चीन व दक्षिण कोरियातले बाजार सोमवारी बंद हेते. शुक्रवारी अमेरिकेतील बाजारात मिळताजुळता कल होता.