शुक्रवारी शेअरबाजार घसरणीसोबत बंद
सेन्सेक्स 200 अंकांनी तर निफ्टी 42 अंकांनी घसरला
वृत्तसंस्था/ मुंबई
शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअरबाजारात दिवसभरात चढउतार पहायला मिळाला. सरतेशेवटी शेअर बाजार घसरणीसोबत बंद झाला. आयटी समभागांच्या खराब कामगिरीचा फटका शेअरबाजाराला बसला.
शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 200 अंकांनी घसरुन 82330 अंकांवर बंद झाला. दुसऱ्या बाजुला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 42 अंकांनी कमकुवत होत 25019 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक सपाट स्तरावर बंद झाला. शुक्रवारीदेखील संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग तेजीसमवेत कार्यरत होते. यामध्ये सर्वाधिक तेजी कोचीन शिपयार्डने अनुभवली होती. कोचीन शिपयार्डचा समभाग 13 टक्के आणि माझगाव डॉकशिपचा समभाग 11 टक्के वाढीसोबत बंद झाला. निफ्टी कॅपिटल निर्देशांक 2.50 टक्के तेजीत होता. फार्मा आणि धातू क्षेत्राचा निर्देशांक घसरणीत पहायला मिळाला.
हे समभाग तेजीत
निफ्टी 50 निर्देशांकात भारत इलेक्ट्रॉनिक्सचे समभाग सर्वाधिक 3.80 टक्के वाढलेले पहायला मिळाले. यासोबत बजाज ऑटो आणि टाटा कंझ्युमर्स यांचे समभाग त्याचप्रमाणे अदानी एंंटरप्रायझेस व हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग 1 ते 2 टक्के इतके तेजीत होते. टाटा मोटर्स, टाटा स्टिल, कोल इंडिया, एनटीपीसी, आयशर मोटर्स, मारुती सुझुकी, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, हिरोमोटो कॉर्प, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले.
हे समभाग घसरणीत
भारती एअरटेलचा समभाग मोठ्या प्रमाणात घसरलेला होता. ब्लॉकडिलमुळे समभाग 3 टक्के घसरणीत होता. एचसीएल टेक, एसबीआय, जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस, सनफार्मा, टायटन, हिंडाल्को, विप्रो, टीसीएस, सिप्ला, अपोलो हॉस्पिटल, श्रीराम फायनान्स, ग्रासीम यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकाने शुक्रवारी चांगली कामगिरी दर्शविली होती. दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 0.8 टक्के, 1 टक्का तेजीसमवेत बंद झाले. एकंदर बाजारात 2525 समभाग तेजीसमवेत कार्यरत होते.