For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

योगसाधनेसाठी मनाला स्थिर करणे अत्यावश्यक असते

06:51 AM Dec 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
योगसाधनेसाठी मनाला स्थिर करणे अत्यावश्यक असते
Advertisement

अध्याय पाचवा

Advertisement

बाप्पा म्हणाले, माणसाचे चित्त हे चंचल असतं. ते सतत कोणत्या ना कोणत्या विषयाचा विचार करत असते. चित्ताला समजावून सांगावं लागतं की, बाबारे तुझी विषयांकडची ओढ मी समजू शकतो. कारण गेले कित्येक जन्म तुला लागलेली विषयांची आवड सहजी सुटण्यासारखी नाही. तरीपण त्यात थोडा बदल करून चांगल्या विषयात लक्ष घाल. करमणुकीच्या विषयात सतत लक्ष घालण्यापेक्षा ईश्वरचिंतन कर कारण ते अंतिमत: फायद्याचं आहे. चित्ताला चुचकारून न बोलता हिडीसफिडीस केलं तर ते बंड करतं आणि दुप्पट जोमाने विषयांच्या पाठी लागतं. म्हणून हा अभ्यास मोठ्या चिकाटीने करावा लागतो. नको त्या ठिकाणी रमणाऱ्या चित्ताला तेथून ओढून काढणे हाच अभ्यास होय आणि हा वारंवार करणे हीच तपश्चर्या होय. उपनिषदात चित्ताला नाठाळ घोड्याची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे एखाद्या नाठाळ घोड्याला ताळ्यावर आणायचे असेल तर प्रथम घोडेस्वार त्याला अंजारून गोंजारून, त्याच्या कलाने घेत घेत हळूहळू त्याला ताळ्यावर आणतो आणि मग त्याच्यावर स्वार होऊन आपल्या मनाप्रमाणे त्याला फिरवतो. त्याप्रमाणे एकदा चित्ताचा विश्वास आपण संपादन केला की, चित्त हळूहळू आपल्याला अपेक्षित असलेल्या ईश्वर स्मरणात रमू लागतं. त्याची निरनिराळ्या इच्छांच्या मागं धावण्याची, लोकप्रियता मिळवण्याची वृत्ती हळूहळू कमी होत जाते आणि एकदा का त्याच्या लक्षात आलं की, हा विषय सोडून इतर नाश पावणाऱ्या विषयात रमण्यात काहीच अर्थ नाही की, मग ते ईश्वराचाच ध्यास घेतं. अर्जुनाने भगवद्गीतेत भगवंतांना विचारले होते की काही केल्या मन किंवा चित्त ताळ्यावर येत नाही ह्याला उपाय काय. कारण चित्त जर स्थिर झालं नाही तर योगाभ्यास कसा पूर्ण होणार? त्यावर भगवंतांनी दिलेल्या उत्तराचे विश्लेषण करताना ज्ञानेश्वर माउली म्हणतात, चित्त लवकर स्थिर होत नाही ही गोष्ट खरीच पण त्यासाठी निदान काही प्रयत्न तर करायला हवा ना, कठीण गोष्ट साध्य करायला तर विशेष प्रयत्न करायला हवेत पण माणसाला दम धरवत नाही. उतावळ्या स्वभावामुळे कोणतीही गोष्ट लगेच साध्य व्हायला हवी असे त्याला वाटत असते. प्रपंचातली एखादी गोष्ट मिळवायची झाली आणि ती सहजसाध्य होत नसली तर तो पुन:पुन्हा प्रयत्न करत असतो. एव्हढे प्रयत्न करून मिळणारी गोष्ट नाशवंत असते. योगसाधना करून मिळणारी गोष्ट चिरंतन असून आयुष्याचे कायमचे भले करून देणारी असते. त्यापूर्वी मनाला स्थिर करणे अत्यंत आवश्यक असते मग त्यासाठी न कुरकुरता न थकता प्रयत्न करायची तयारी त्याने दाखवायला हवी. अभ्यास आणि वैराग्य यामुळे मनावर काबू मिळवता येतो. संयमवंतास वरील उपायाने हे साध्य होते. मनाला स्थिर करायचा उपाय सांगितल्यावर बाप्पा पुढे म्हणतात, मन स्थिर करण्यासाठी वैराग्याचाही खूप उपयोग होतो. आपल्याला जे काही प्राप्त झालं आहे त्यात समाधानी राहणं म्हणजे वैराग्य होय. अशा पद्धतीने मनुष्य समाधानी राहू शकला की, त्याला नवनवीन इच्छा होत नाहीत आणि त्या पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल ह्या विचाराने मन इतस्तत: धावत नाही.

वर सांगितलेले प्रयत्न करून वैराग्यपूर्ण वृत्तीने साधकाने मनाला अंकित करून घेतले आणि त्याला स्थिर राहायला भाग पाडल्यावर त्याचे फळ म्हणून त्याला पराकोटीची निवृत्ती प्राप्त होते, तो ईश्वरस्वरूप होतो.

Advertisement

एवं कुर्वन्सदा योगी परां निर्वृतिमृच्छति ।

विश्वस्मिन्निजमात्मानं विश्वं च स्वात्मनीक्षते ।। 15 ।।

अर्थ- सर्वदा याप्रमाणे करणारा योगी अत्यंत श्रेष्ठ असे सुख पावतो. विश्वामध्ये आपला आत्मा व आपल्या आत्म्यामध्ये विश्व आहे असे तो पाहतो. सविस्तर पाहूयात पुढील भागात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.