अमेरिकेत अजूनही ‘सरकारी लॉकडाऊन’
डोनाल्ड ट्रम्प चौथ्यांदा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी ठरल्यामुळे सलग चौथ्या दिवशी देशव्यापी ‘सरकारी लॉकडाऊन’ कायम आहे. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या निधी विधेयकाला सिनेटमध्ये आवश्यक असलेल्या 60 मतांच्या तुलनेत 54 मते मिळाली. मतदानानंतर विरोधी डेमोक्रॅट्स सभागृहाबाहेर पडले. लाखो अमेरिकन लोकांना परवडणारे आरोग्य विमा देण्यासाठी डेमोक्रॅट्सना कोविड-19 कर क्रेडिट्स (आरोग्यसेवा अनुदान) वाढवायचे आहेत.
अमेरिकेत बुधवारपासून शटडाऊन
अमेरिकेत मंगळवारच्या मतदानानंतर बुधवारपासून सरकारी शटडाऊन सुरू झाले. परिणामत: सरकारी संस्था सध्या बंद आहेत. प्रतिनिधी सभागृहात पुढील आठवड्यात होणारे सर्व मतदान 14 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आले आहे. याचा अर्थ अमेरिकेतील शटडाऊन 14 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, अमेरिकन सरकारने अंदाजे 7,50,000 सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे. त्यापैकी 3,00,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता आहे. सध्या लष्करी कर्मचारी, सीमा एजंट आणि हवाई वाहतूक नियंत्रक पगाराशिवाय काम करत आहेत.
अमेरिकेत सध्या निधी विधेयकाचा तिढा निर्माण झाला आहे. हे विधेयक मंजूर होण्यासाठी ट्रम्प यांना डेमोक्रॅट्सचा पाठिंबा आवश्यक आहे. 100 सदस्यांच्या सिनेटमध्ये 53 रिपब्लिकन आणि 47 डेमोक्रॅट्स आहेत. दोन अपक्ष प्रतिनिधींनी आधीच या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. ट्रम्प यांना अजूनही रिपब्लिकन पक्षाला डेमोक्रॅट्सच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे, परंतु ते सध्या विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यास तयार नसल्यामुळे ‘सरकारी लॉकडाऊन’ची नामुष्की ओढवली आहे.