Satej Patil: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षासाठी लढाई, कार्यकर्त्यांचा निश्चय
शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही काँग्रेस पक्ष आणि आमदार सतेज पाटील यांच्यासोबत
कोल्हापूर : काँग्रेसचे एकनिष्ठ पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल आणि राजेश पाटील यांनी पक्ष बदलाची घेतलेली भूमिका दुर्दैवी आहे. मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही काँग्रेस पक्ष आणि आमदार सतेज पाटील यांच्यासोबत आहोत. असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
वडणगे, शिये आणि शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये मेळावा झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. वडणगे, शिये आणि शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी काँग्रेस कमिटीत झाला.
आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. राहुल पाटील आणि राजेश पाटील यांचा काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचे आधीच ठरले होते, मग आमच्यावर ठपका कशाला ठेवता, असे सांगत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
तीन दशकांपासून एकनिष्ठ असणारी माणसे सोडून निघालीत. पक्ष सोडताना अडचण सांगत आहात, तुम्हाला अशी कोणती अडचण निर्माण झाली अशी विचारणा कार्यकर्त्यांनी राहुल पाटील यांना केली. संजय पाटील- वाकरेकर हे कार्यकर्ते म्हणाले, ज्यांना सत्तेच्या लाभाशिवाय जमत नाही असे लोकच पक्ष सोडून दुसरीकडे निघाले आहेत, जे पक्षाशी एकनिष्ठ आहेत ते पक्षासोबतच आहेत.
जे पक्ष सोडून जात आहे ते लाभार्थी आहेत अशा शब्दांत पक्ष सोडणाऱ्यांना सुनावले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती दशरथ माने, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले, पांडुरंग पाटील, रामकृष्ण पाटील, प्रकाश लाड, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, अमर पाटील आदींनी अखेरच्या श्वासापर्यंत, काँग्रेस पक्ष आणि सतेज पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची ग्वाही दिली.
करवीर मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर जिल्हा पहिल्यापासून काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसमधील बहुतांश मंडळी गेली, अशा काळात स्व. पी. एन. पाटील यांनी जिह्यात काँग्रेसचा अभेद्य गड लढवला. राहुल आणि राजेश पाटील यांनी जाऊ नये यासाठी प्रयत्न केले.
पक्षाचे वरिष्ठही त्यांच्याशी बोलले, पण ते गेले. आता करवीर मतदारसंघात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी माझ्यावर जबाबदारी आहे, तशी भूमिका घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मला पक्षासाठी लढाई लढावी लागेल असेही पाटील यांनी सांगितले.