स्टीव्ह स्मिथ पुन्हा कर्णधार
विंडीजविरुद्ध वनडे मालिकेत करणार नेतृत्व : ऑस्ट्रेलियाच्या कसोटी व वनडे संघाचीही घोषणा
वृत्तसंस्था/ सिडनी
गतवर्षात आयसीसी वनडे वर्ल्डकप, नव्या वर्षात पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेत धमाकेदार यश मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ आता मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी सज्ज झाला आहे. उभय संघात दोन कसोटी, तीन वनडे व तीन टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी कसोटी व वनडे संघाची घोषणा बुधवारी करण्यात आली. विशेष म्हणजे, या संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळाले. अनुभवी स्टीव्ह स्मिथकडे ऑस्ट्रेलियन वनडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबतची माहिती दिली.
वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिकेसाठी बुधवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपले संघ घोषित केले. यातील वनडे संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळाले. वेस्ट इंडीजचा पहिला कसोटी सामना 17 ते 21 जानेवारी तर दुसरा सामना 25 ते 29 जानेवारी दरम्यान होणार आहे. यानंतर उभय संघांतील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 2 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. या मालिकेसाठी स्मिथकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स वनडे मालिकेत सहभागी होणार नसल्याने स्मिथकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. मागच्या काही महिन्यांपासून कमिन्सने विनाविश्रांती क्रिकेट खेळले आहे, याच कारणास्तव कमिन्सने वनडे मालिकेतून माघार घेतली असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले. दरम्यान, वेगवान गोलंदाज लान्स मॉरिस, झाय रिचर्डसन, अॅरॉन हार्डी, मॅट शॉर्ट आणि नॅथन एलिस यांना वनडे संघात स्थान देण्यात आले आहे.
कसोटी संघात कॅमरुन ग्रीनला संधी
पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर डेव्हिड वॉर्नरनेही कसोटी फॉरमॅटचा निरोप घेतला. आता कांगारू संघ कोणत्या खेळाडूवर उस्मान ख्वाजासोबत डावाची सलामी देण्याची जबाबदारी सोपवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी कॅमेरॉन ग्रीनला संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय, निवडकर्त्यांनी या मालिकेसाठी डावखुरा फलंदाज मॅट रेनशॉचा देखील समावेश केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ - ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, लाबुशेन, मॅट रेनशॉ, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, जोश हेझलवूड, नॅथन लियॉन, मिचेल स्टार्क.
वनडे मालिकेसाठी ऑसी संघ - स्टीव्ह स्मिथ (कर्णधार) शॉन एबॉट, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, अॅरॉन हार्डी, ट्रॅविस हेड, जोश इंग्लिश, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, लान्स मॉरिस, झाय रिचर्डसन, मॅट शॉर्ट, अॅडम झाम्पा.