स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी कुंभमध्ये करणार कल्पवास
वृत्तसंस्था/ प्रयागराज
महाकुंभला श्रद्धा आणि संस्कृतींचे संगम म्हटले जाते. महाकुंभ युगांपासून आयोजित होत असून तो माणसाला माणसांशी जोडतो. प्रयागराजमध्ये आयोजित होणारा महाकुंभ-2025 याचे अचूक उदाहरण ठरणार आहे. अॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी आणि जगातील सर्वात धनाढ्या महिलांपैकी एक लॉरेन पॉवेल जॉब्स प्रयागराज मधील महाकुंभमध्ये सहभागी होणार आहेत.
अब्जाधीश लॉरेन महाकुंभमध्ये कल्पवास देखील करणार आहेत. तसेच साधुंच्या सान्निध्यात साधे जीवन जगणार आहेत. दिवंगत पती स्टीव यांच्याप्रमाणेच लॉरेन देखील हिंदू अन् बौद्ध धर्माशी विशेष आत्मियता बाळगून आहेत. लॉरेन या महाकुंभमध्ये स्वत:च्या गुरुला भेटायला येत आहेत. आम्ही त्यांना आमचे गोत्रही दिले आहे. त्यांचे नाव कमला ठेवण्यात आले आहे. त्या आमच्यासाठी मुलीसमान आहेत असे उद्गार अध्यात्मिक गुरु कैलाशानंद महाराज यांनी काढले आहेत.
61 वर्षीय लॉरेन 13 जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये पोहोचतील. महापुंभमध्ये लॉरेन यांच्या वास्तव्यासाठी विशेष व्यवस्था महाराजा डिलक्स कॉटेजमध्ये करण्यात आली आहे. त्या निरंजनी अखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरात 29 जानेवारीपर्यंत राहतील आणि सनातन धर्माला जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करतील. 19 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कथेच्या पहिल्या यजमान देखील असतील.