‘पाऊले चालती पंढरीची वाट’
बेळगाव परिसरातून दिंड्या मार्गस्थ : वारकऱ्यांना आषाढी एकादशीची ओढ
बेळगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने दिंडी सोहळ्यांना प्रारंभ होत आहे. 28 जूनला देहू येथून तुकाराम महाराज तर 29 जून रोजी आळंदी येथून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. यासाठी बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातूनही दिंड्यांचे प्रस्थान होत आहे. बेळगाव शहर आणि परिसरातून दरवर्षी 10 ते 15 दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. यंदादेखील दोन दिंड्यांनी प्रस्थान केले असून उर्वरित दिंड्याही एक-दोन दिवसांत मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
बेळगाव परिसरातून बेळगाव, कसबा नंदगड, कणबर्गी, निलजी, केदनूर, आंबेवाडी, सुळगा, कुद्रेमनी, कंग्राळी खुर्द, सांबरा, बेकिनकेरे, सावगाव येथून पायी दिंड्या मार्गस्थ होणार आहेत. यापैकी काही दिंड्या पंढरपूरच्या वाटेवर चालू लागल्या आहेत. हातात पताका, डोक्यावर कळशी आणि टाळ-मृदंगाच्या गजरात शेकडो वारकरी यामध्ये सहभागी होणार आहेत. विठूरायाच्या दर्शनाची आस वारकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे वारकरी ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ असे म्हणत मार्गक्रमण करू लागले आहेत. यामध्ये काही दिंड्यांनी 20 ते 25 वर्षे आपली परंपरा कायम राखली आहे. बेळगाव, होनगा, चिकोडीमार्गे या दिंड्या पुढे मार्गस्थ होतात. दिंडी मार्गावर भजन, कीर्तन आणि कार्यक्रमही होतात. विशेषत: युवा पिढी निर्व्यसनी व्हावी आणि चांगली संगत मिळावी यासाठी काही जण स्वेच्छेने दिंडीत सहभागी होताना दिसत आहेत.