प्रदीर्घ काळ रहा तरुण...
वृद्धत्व किंवा म्हातारपण सर्वांना अप्रिय असते, ही वस्तुस्थिती आहे. वृद्धपणी गात्रे शिथील आणि दुर्बल होतात. त्यामुळे तरुणपणीचा कामाचा वेग कमी होतो. पुढे तर एकेक अवयव निकामी होऊ लागतात आणि दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची वेळ येते, जी कोणालाही नको असते. त्यामुळे माणसाचे वृद्धत्व कसे लांबणीवर टाकता येईल, याचे संशोधन जगात अनेक दशकांपासून होत आहे. अलिकडच्या काळात या संशोधनाला यश येताना दिसत आहे. एक औषध असे निर्माण करण्यात आले आहे, की ज्यामुळे वृद्धत्वाचा वेग कमी होणार आहे.
जपानमधील ओकासा विद्यापीठातील संशोधकांनी या अद्भूत औषधाचा शोध लावला आहे. हे औषध वृद्धत्वामुळे होणारी शरिराची झीज आणि गात्रांचा दुर्बलपणा दूर करु शकते. त्यामुळे कोणतीही व्यक्ती अधिक काळ तरुण राहू शकते. या औषधामुळे माणसाचे आयुष्यही वाढू शकते आणि प्रदीर्घ काळापर्यंत माणूस स्वावलंबी राहू शकतो. वय वाढते तशा पेशी कमजोर होतात. त्यामुळे त्या त्यांना शक्ती देणाऱ्या प्रथिनांचे शोषण करु शकत नाहीत. परिणामी ही प्रथिने शरिरात साठतात. तसेच पेशी अधिकाधिक दुर्बळ होतात. वृद्धत्वात होणारे बरेचसे विकार ही प्रथिने रक्तात साठल्याने होतात. याच कारणाने मधुमेह हृदयरोग किंवा संधीवातासारखे दुर्धर आजार होतात. हे औषध शरिरातील ही टाकावू प्रथिने कमी करते. तसेच, पेशी पोषकद्रव्ये शोषून घेऊ शकतील, अशी क्षमता त्यांच्यात निर्माण करते. यामुळे वृद्ध पेशीही नव्या जोमाने काम करु लागतात. त्यामुळे माणूस वृद्ध होण्याचा वेग मंदावतो. तो अधिक काळ तरुण राहतो. तसेच तो अधिक काळापर्यंत निरोगी राहू शकतो. या औषधाचे नाव ‘आययु 1’ असे असून त्यावर अधिक प्रयोग ओसाका विद्यापीठात करण्यात येत आहेत, अशी माहिती आहे.