अज्ञान, अंधश्रद्धेपासून दूर रहा!
बालदिन कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आवाहन
बेंगळूर : राज्यात यंदा 900 कर्नाटक पब्लिक स्कूल (केपीएस) सुरू करण्यात येणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. देशाचे भविष्य तर्कसंगत आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असणाऱ्या मुलांकडून घडविले जाऊ शकते. त्यामुळे मुलांनी अज्ञान आणि अंधश्रद्धा यापासून दूर राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याने विधानसौध येथे आयोजिलेल्या ‘राज्यस्तरीय बालदिन आणि पालक-शिक्षक महासभा’ कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. मुले हीच भारताचे भविष्य आहेत, असा दूरदृष्टीकोन पंडीत नेहरुंचा होता. त्यामुळे त्यांनी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणाऱ्या शिक्षणावर भर दिला होता. आमच्या सरकारनेही शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. शिक्षणासाठी अर्थसंकल्पात 66,000 कोटी रुपये दिले आहेत, असे ते म्हणाले.
राज्यात यंदा पब्लिक स्कूल
यंदा राज्यात 900 कर्नाटक पब्लिक स्कूल सुरू करण्यात येणार आहेत. चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी सरकार परिश्रम घेत आहे. सरकारी शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज अनेक महत्त्वाच्या पदांवर आहेत. त्यामुळे सरकारी शाळांमधील मुले स्वाभिमानाने समाजाभिमुख व्हावेत यासाठी त्यांना मोफत गणवेश, बूट-सॉक्स, शिष्यवृत्ती, पाठ्यापुस्तके, मध्यान्ह आहाराबरोबरच अंडी, केळी वितरित केले जात आहेत. मुलांनी याचा लाभ घेऊन देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी केले.