आरपीडी-जीएसएस कॉलेजना स्वायत्त महाविद्यालयांचा दर्जा
नॅकद्वारे केलेल्या मूल्यमापनानुसार प्राप्त : कमवा आणि शिका तत्त्वावर प्रवेश : टीचिंग अँड लर्निंगवर भर : पदवी विद्यार्थ्यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध
बेळगाव : एसकेई सोसायटीच्या आरपीडी कला आणि वाणिज्य कॉलेज तसेच जीएसएस कॉलेजला विद्यापीठ अनुदान आयोग आणि भारत सरकारच्या नियमानुसार स्वायत्त महाविद्यालय हा दर्जा प्राप्त झाला आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षानुसार ही दोन्ही कॉलेज स्वायत्त असतील. या संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रा. एस. वाय. प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली. एसकेईचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांची दूरदृष्टी, शिक्षणाबद्दलची आस्था आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार महत्त्वाचा असून त्यांच्या प्रयत्नाने स्वायत्त दर्जा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. या संदर्भात आरपीडीची माहिती देताना प्राचार्य डॉ. अभय पाटील म्हणाले, आरपीडी हे एक नावाजलेले कॉलेज आहे. नॅकने 2000 मध्ये या कॉलेजला मानांकन दिले. ज्या शैक्षणिक संस्था नॅकद्वारे केल्या गेलेल्या मूल्यमापनानुसार सातत्यपूर्ण गुणवत्ता टिकवून आहेत, ज्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा आहेत, शिक्षणाच्या गुणवत्तेत नाविन्य आणण्याची क्षमता आहे, त्यांना स्वायत्त हा दर्जा देण्यात येतो. आरसीयूच्या कार्यकक्षेतील मोजक्याच कॉलेजपैकी आरपीडी एक आहे. स्वायत्ततेचा दर्जा कॉलेज, तेथील अभ्यासक्रम आणि परीक्षा प्रणालीची रचना लवचिक करेल. मुख्यत: ती काळानुसार आवश्यक शैक्षणिक प्रणाली स्वीकारेल.
कॉलेजतर्फे कला, वाणिज्य व व्यवसाय प्रशासन या विषयात पदवी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येथे अनेक पर्याय आहेत. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयांसोबत पत्रकारिता, भूगोल तसेच मराठी, कानडी, इंग्रजी आणि हिंदी भाषेतील साहित्याचा अभ्यासही येथे केला जातो. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे स्वतंत्र केंद्रही कॉलेजच्या परिसरात गेल्या 30 वर्षांपासून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जीएसएस कॉलेजलासुद्धा स्वायत्त हा दर्जा देण्यात आला आहे. नॅकने सलग चार वेळा मानांकन दिल्याने कॉलेजला स्वायत्त हा दर्जा मिळाला आहे. संपूर्ण देशात 45 हजारहून अधिक कॉलेज असून त्यापैकी 995 कॉलेजना स्वायत्त हा दर्जा मिळाला आहे. कर्नाटकात 165 कॉलेजना हा दर्जा प्राप्त झाला आहे. आरसीयूच्या कक्षेमध्ये 389 कॉलेज येत असून त्यापैकी 5 कॉलेजना स्वायत्त दर्जा मिळाला असून त्यामध्ये जीएसएस कॉलेजचा समावेश असल्याची माहिती प्राचार्य बी. एल. मजुकर यांनी दिली.
ते म्हणाले, बदलत्या बाह्याजगाला आणि तंत्रज्ञानाला सामोरे जाताना कोणत्याही प्रश्नाची हाताळणी कशी करावी, याचे शिक्षण इथे मिळेल. कमवा आणि शिका या तत्त्वावर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. सध्या कॉलेजमध्ये 7 पदवी व 7 पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. यंदा डिप्लोमा इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यंदा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील जीएसएस हे एकमेव डिग्री कॉलेज आहे, जेथे आयएसओ 9001:2018 या लॅबबरोबर एनएबीएल ही लॅब उपलब्ध आहे. एनएबीएल ही भारतातील एकमेव संस्था आहे, जेथे पाण्याचे परीक्षण केले जाते व पाण्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी पर्याय शोधण्यात येतात. कॉलेजने अनेक उद्योग समूहांबरोबर समन्वय करार केला असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होणार असल्याचे नमूद केले.
याशिवाय मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, एनव्हिरॉन्मेंटल सायन्स, ऑर्गेनिक केमिस्ट्री हे अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारे उत्तर कर्नाटक आणि आरसीयूच्या कक्षेतील हे एकमेव कॉलेज असल्याचे सांगितले. स्वायत्त दर्जा मिळाल्याने विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील असे अभ्यासक्रम तयार करणे कॉलेजला शक्य होणार आहे. बीसीएची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण घेता येणार आहे. व्यक्तिमत्त्व विकास आणि सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षणही येथे देण्यात येत असून भाषा विभागातर्फे लँग्वेज लॅब सुविधा उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. स्वायत्त दर्जा मिळाल्यानंतर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे, याकडे लक्ष वेधले असता आमच्या संस्थेमध्ये प्रवेश वाढत आहेत. सर्व स्टाफने परिश्रम घेऊन अभ्यासक्रम तयार केला आहे. शिकविण्यापेक्षा शिकून घेण्यावर (टीचिंग अँड लर्निंग) संस्थेचा भर आहे, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी डॉ. शरयू पोतनीस यांनी स्वागत केले. डॉ. एच. बी. कोलकार यांनी आभार मानले. याप्रसंगी जीएसएस व आरपीडीच्या कार्यकारी मंडळाच्या चेअरमन माधुरी शानभाग व व्हाईस चेअरमन बिंबा नाडकर्णी उपस्थित होत्या.