For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्याचा बारावी निकाल 73.45 टक्के

06:57 AM Apr 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज्याचा बारावी निकाल 73 45 टक्के
Advertisement

93.90 टक्के निकालासह उडुपी जिल्हा अव्वल : यादगिरी 48.45 टक्के निकालासह शेवटच्या स्थानी

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

काळजी, चिंता आणि हुरहुर लागून राहिलेल्या बारावी परीक्षा-1 चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. राज्याचा बारावी परीक्षेचा एकूण 73.45 टक्के निकाल लागला असून नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली. यावर्षी एकूण 6,37,805 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 4,68,439 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला विभागातील 53.29 टक्के, वाणिज्य विभागातून 76.07 टक्के आणि विज्ञान शाखेतील 82.54 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात उडुपी जिल्हा अव्वल ठरला आहे. या जिल्ह्याचा निकाल 93.90 टक्के लागला आहे. त्या पाठोपाठ 93.57 टक्के निकालासह मंगळूर जिल्हा दुसऱ्या स्थानावर तर 85.36 टक्के निकालासह बेंगळूर दक्षिण जिल्हा तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. यादगिरी जिल्हा 48.45 टक्के निकालासह शेवटच्या म्हणजेच 32 व्या स्थानावर राहिला आहे.

Advertisement

कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परीषदेत शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा यांनी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्यात 1 मार्च ते 20 मार्च दरम्यान 1,171 केंद्रावर बारावी परीक्षा घेण्यात आली होती. तर 21 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत 76 मूल्यपामन केंद्रावर उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या होत्या. निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 77.88 टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 68.20 टक्के आहे. यावर्षी 3,45,694 मुलींनी परीक्षा दिली होती. यापैकी 2,69,202 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 2,92,111 मुलांपैकी 1,99,227 मुले उत्तीर्ण झाली आहेत.

इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचा वरच्ष्मा

शहरी भागातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना पिछाडीवर टाकले आहे. शहरी विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 74.55 टक्के आहे. तर ग्रामीण विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 69.33 टक्के आहे. कन्नड माध्यमातून परीक्षा दिलेल्यांपैकी 56.37 टक्के आणि इंग्रजी माध्यमातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 81.75 टक्के आहे.

विशेष श्रेणीत  1,00,571 जण उत्तीर्ण

85 टक्क्यांपेक्षा म्हणजेच विशेष श्रेणीत 1,00,571, प्रथम श्रेणीत म्हणजे 85 टक्क्यांपेक्षा कमी आणि 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2,78,054 इतकी आहे. तर द्वितीय श्रेणीत म्हणजेच 60  टक्क्यांपेक्षा कमी व 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्यांची संख्या 70,969 इतकी आहे. तृतीय श्रेणीत 18,845 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

100 पैकी 100 गुण

कन्नड विषयात 5,414, संस्कृतमध्ये 2,534, बिझनेस स्टडीजमध्ये 1,482, स्टॅटीस्टीक 2013, जीवशास्त्र 2,346, गणित 4038 आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये 1137 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.

सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 56.11 टक्के तर अनुदानित पदवीपूर्व महाविद्यालयांचा निकाल 62.69 टक्के आणि विनाअनुदानीत पदवीपूर्व महाविद्यालयांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 82.66 टक्के इतके आहे.

123 महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के

राज्यातील 13 सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला, तर 3 अनुदानित आणि 103 विनाअनुदानित महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के, 8 पदवीपूर्व महाविद्यालय, 20 अनुदानित, 90 विनाअनुदानित व 5 वसती, पदवीपूर्व महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

यावेळी बारावी परीक्षा-2 व 3 नि:शुल्क

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना विद्यार्थ्यांना बारावी परीक्षा 2 आणि 3 देण्याची संधी आहे. या परीक्षा देण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क देण्याची गरज नाही. ही सुविधा केवळ यंदापुरतीच मर्यादित आहे. पुढील वर्षी नेहमीप्रमाणे प्रत्येक विषयासाठी नियोजित शुल्क वसूल केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

तीन विद्यार्थिनी राज्यात प्रथम

विज्ञान शाखेतील मंगळूरमधील एक्सपर्ट पी. यु. कॉलेजची विद्यार्थिनी अमुल्या कामत, शिमोग्याच्या तिर्थहळ्ळी येथील वाग्देवी पी. यु. कॉलेजची विद्यार्थिनी दिक्षा आर., वाणिज्य शाखेतील मंगळूमधील कॅनरा पी. यु. कॉलेजची विद्यार्थिनी दीपश्री एस. यांनी 600 पैकी 599 गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

24 एप्रिलपासून बारावी परीक्षा-2

बारावी परीक्षा-2 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही परीक्षा 24 एप्रिल ते 8 मे दरम्यान होणार आहे. निकाल सुधारण्यासाठी परीक्षा-2 ला हजर होऊ शकतात. परीक्षा-3 जून 9 ते 21 दरम्यान होईल. हजेरीतील कमतरतेमुळे परीक्षा-1 ला हजर होणे शक्य न झालेले विद्यार्थी परीक्षा-2 किंवा 3 साठी नोंदणी करू शकतात.

जिल्हानिहाय परीक्षेचा निकाल

अ. क्र.     जिल्हा              निकाल

  1. उडुपी 93.90 टक्के
  2. मंगळूर 93.57 टक्के
  3. बेंगळूर दक्षिण 85.36 टक्के
  4. कोडगू 83.84 टक्के
  5. बेंगळूर उत्तर 85.36 टक्के
  6. कारवार 82.93 टक्के
  7. शिमोगा 79.91 टक्के
  8. बेंगळूर ग्रामीण 79.70 टक्के
  9. चिक्कमंगळूर 79.91 टक्के
  10. हासन 77.56 टक्के
  11. चिक्कबळ्ळापूर 76.80 टक्के
  12. म्हैसूर 74.30 टक्के
  13. चामराजनगर 73.97 टक्के
  14. मंड्या 73.27 टक्के
  15. बागलकोट 72.83 टक्के
  16. कोलार 72.45 टक्के
  17. धारवाड 72.32 टक्के
  18. तुमकूर 72.02 टक्के
  19. रामनगर 69.71 टक्के
  20. दावणगेरे 69.45 टक्के
  21. हावेरी 67.56 टक्के
  22. बिदर 67.31 टक्के
  23. कोप्पळ 67.20 टक्के
  24. चिकोडी 66.76 टक्के
  25. गदग 66.64 टक्के
  26. बेळगाव 65.37 टक्के
  27. बळ्ळारी 64.41 टक्के
  28. चित्रदुर्ग 59.87 टक्के
  29. विजापूर 58.81 टक्के
  30. रायचूर 58.75 टक्के
  31. कलबुर्गी 55.70 टक्के
  32. यादगिरी 48.45 टक्के
Advertisement
Tags :

.