अवमान प्रकरणातील दोन खटल्यांमध्ये कार्यकर्त्यांचे जबाब
21 सप्टेंबर रोजी खटल्यांचा निकाल
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान झाल्यानंतर धर्मवीर संभाजी चौक येथे निषेध नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी म. ए. समितीच्या आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन खटल्यांची सुनावणी गुरुवारी होती. त्याठिकाणी कार्यकर्त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून 21 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान झाल्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटले होते. येथील कार्यकर्त्यांनीही त्याचा निषेध नोंदविला म्हणून खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये व मार्केट पोलीस स्थानकामध्ये गुन्हे दाखल केले होते. खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये दोन गुन्हे दाखल केले होते. रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके, प्रकाश शिरोळकर, सरिता पाटील, भारत मेणसे, नरेश निलजकर, अंकुश केसरकर, लोकनाथ राजपूत, हरिश मुतगेकर, विनायक कंग्राळकर, मदन बामणे यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुरुवारी या खटल्यांमध्ये तिसरे जेएमएफसी न्यायालयामध्ये सर्वांची साक्ष घेण्यात आली आहे. न्यायाधीशांनी साक्ष नोंदवून घेतली असून 21 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर करणार आहेत. या सर्वांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. महेश बिर्जे, अॅड. प्रताप यादव, अॅड. हेमराज बेंच्चण्णावर हे काम पहात आहेत.