जिल्हाधिकारी-तहसीलदारांना धनगर-गवळी समाजातर्फे निवेदन
आमदार शांताराम सिद्धी यांच्या उपस्थितीत विविध मागण्या : बैठक घेऊन समस्या सोडविणार
खानापूर : बेळगाव जिल्हा धनगर-गवळी समाज संघटनेतर्फे खानापूर तालुक्यातील गवळी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन विधानपरिषद सदस्य शांताराम सिद्धी यांच्या उपस्थितीत बुधवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांना दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपण याबाबत तालुका पातळीवर बैठक घेऊन समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देवू, असे सांगितले. तालुक्यातील धनगर, गवळी समाजाच्या समस्याबाबत विधानपरिषद सदस्य शांताराम सिद्धी यांनी समाजाची बैठक घेऊन समस्या जाणून घेऊन याबाबत समाजाच्या पंचासह जिल्हाधिकारी आणि तहसीलदाराना भेटून तालुक्यातील धनगर, गवळी समाजाच्या समस्या सोडविण्याबाबत चर्चा केली आणि निवेदन सादर केले.
5 गवळीवाड्यांना अद्याप वीज नाही
निवेदनात तालुक्यात धनगर गवळी समाजाच्या विविध ठिकाणी तसेच अतिशय दुर्गंम भागात वाड्या वस्त्या आहेत. या वाड्या वस्त्यांना अद्याप मूलभूत सुविधा पुरविलेल्या नाहीत. त्यामुळे समाजाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच अद्याप पाच गवळीवाड्यावर विद्युतपुरवठा नाही. त्यामुळे या गवळीवाड्यावरील नागरिकांचे जीवन अत्यंत कष्टप्रद आहे. यासाठी शासनाने सर्व मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच विजयनगर गवळीवाडा, राजवळ गवळीवाडा, श्रीकृष्ण गवळीवाडा, मोरब गवळीवाडा, हंड्डुकुप्पे गवळीवाडा, कुसमळी गवळीवाडा यासह इतर अठरा गवळीवाड्यांचे महसूल गाव म्हणून महसूल खात्यात नमूद करण्यात यावे आणि शासनाच्या सर्व सुविधा मिळवून द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले. यावेळी भैरु पाटील, आप्पू शिंदे, बाबू बावदाणे, बाबुराव आवणे तसेच तालुक्यातील सर्व गवळीवाड्यातील नागरिक आणि संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.