विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पीक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. यावर त्वरित उपाययोजना राबविण्यात याव्यात. खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वैद्यकीय सुविधा नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. सदर भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कृषक समाज संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना प्रत्येकवर्षी बसत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात येत आहे. यावर त्वरित उपाययोजना राबविण्यात याव्यात. राज्यातील जिल्हा व राष्ट्रीय महामार्गांवर बेकायदेशीरपणे धाबे व दुकाने थाटली जात आहेत.
सदर बेकायदेशीर व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करावी. खानापूर तालुक्यात दुर्गम भागातील गावांमध्ये वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा गैरसोयी निर्माण होत असून प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. महानगरांसह इतर लहान शहरांमध्ये वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ही समस्या भविष्यात वाढण्याची शक्यता असून व्यापारी, व्यावसायिकांना जागा निश्चित करून देण्यात यावी व समस्येवर तोडगा काढावा. राज्यातील टोल गेटवरील शुल्क आकारण्याचा कालावधी संपला असला तरी शुल्क आकारणी सुरूच आहे. ही प्रक्रिया रद्द करून विनाशुल्क वाहतुकीला सोय करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.