अरसीकेरेच्या शेतकरी संघटनेचे मागण्यांचे निवेदन
बेळगाव : शेतकरी नेते प्रा. एम. डी. नंजुंडस्वामी यांनी स्थापन केलेल्या शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारला निवेदन देण्यात आले. सुवर्ण गार्डन परिसरात निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन पाठविले. चाळीस मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. यासाठी अरसीकेरेहून रेल्वेने शेतकरी मोठ्या संख्येने बेळगावात दाखल झाले होते. बेलूर तालुक्यातील सरकारी जमीन शेतकऱ्यांना कृषीसाठी उपलब्ध करून द्यावी, बेंगळूर ग्रामीण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सुपीक जमीन कारखानदारांना देणे थांबवावे, तुमकूर जिल्ह्यातील गुब्बी तालुक्यातील काही गावांमध्ये वनखात्याकडून शेतकऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत, ते त्वरित थांबवावेत, कमी किमतीत रासायनिक खत उपलब्ध करून द्यावे, कृषी उत्पन्न बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्यावा, पावसामुळे पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी, आदी विविध 40 मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवेदन दिले आहे.