विकासकामे पूर्ण करण्यासाठीच शिंदे शिवसेना गटात सहभागी
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे प्रतिपादन
मालवण (प्रतिनिधी)
मी नगराध्यक्ष म्हणून पाच वर्षात सुरु केलेली कामे पुढे सरकत नव्हती हे माझे शिवसेनेत सक्रिय होण्यामागे किंवा प्रवेश करण्यामागे कारण होते. मी काही माझी वैयक्तिक कामे केली नाहीत तर मालवण शहराच्या विकासासाठी कामे केली, मात्र मला त्यावेळी सहकार्य मिळत नव्हते, असे प्रतिपादन मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी कुंभारमाठ येथे शिवसेना मेळाव्यात बोलताना केले.
मालवण कुंभारमाठ येथे शिंदे शिवसेनेचा मेळावा संपन्न झाला. त्यावेळी महेश कांदळगावकर हे बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, तालुकाप्रमुख राजा गावकर, बबन शिंदे आदी व इतर उपस्थित होते.यावेळी महेश कांदाळगावकर म्हणाले, मी मालवण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली ती शिवसेना भाजप युतीमधून लढवली. मला निवडून देण्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जेवढी मदत केली, तेवढीच मदत भाजपच्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली होती. त्यामुळे पद मिळू शकले. त्यावेळी माझे चिन्ह धनुष्यबाण होते, आणि आजही धनुष्य बाण चिन्ह आहे. त्यामुळे मी कुठच्या पक्षाशी प्रतारणा केली नाही. मी दुसऱ्या कुठल्या पक्षात गेलो नव्हतो. मला शिवसेनेत सक्रिय करून घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, असेही ते म्हणाले.
नगरपालिकेतील प्रशासक कामे करत नसल्याने विकासकामे रखडली. शहरातील स्वच्छता मोहीम फक्त फोटो सेशन पूरती राहिली, लोकांचे आरोग्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. फोवकांडा पिंपळ येथील गार्डनची दुरावस्था झाली. मालवण शहरातील भुयारी गटार योजनेसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलो तेव्हा योजनेसाठी कर्ज काढावे लागेल असे सांगण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मध्यस्थी करत कर्ज नाही तर अनुदान प्राप्त करून दिले. पाणी पुरवठा योजना देखील महायुती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली. तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात या योजनेची निविदा प्रक्रिया झाली, असेही कांदळगावकर म्हणाले.
राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसारखी चांगली योजना राबवली आहे, यामुळे महिलांचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. महायुतीची कामे भरमसाठ आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारात या कामांसह लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना झालेले फायदे लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे. केंद्रात भाजप महायुतीची सत्ता आहे, आता राज्यातही महायुतीची सत्ता येणे गरजेचे आहे. राज्यात महायुती सरकार आल्यास केंद्रात दादा आणि राज्यात निलेश दादा अशी स्थिती होणार आहे. त्यामुळे गावागावतील विकास कामासाठी निधी येणार आहे, निलेश राणे यांना मी मताधिक्याच्या शुभेच्छा देतो, असेही महेश कांदळगावकर म्हणाले.