दलित संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : रेल्वेस्टेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पाचे अनावरण करण्यासाठी दलित व हिंदू संघटनांकडून आंदोलन करण्यात आले होते तरी याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्वरित याची दखल घेऊन अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी कर्नाटक राज्य दलित संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली. शहरामध्ये स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बसवेश्वर सर्कल ते नाथ पै सर्कलपर्यंत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या गाळ्यांचे लोकार्पण अद्याप करण्यात आले नाही. सदर दुकान गाळे आकाराने कमी असल्याने उपयोगी होणार नाही. यासाठी दोन गाळे मिळून एक दुकान करण्यात यावे. तसेच त्याला शटरची व्यवस्था करण्यात यावी. गाळे निर्माण करून अनेक दिवस उलटले तरी त्याचा उपयोग करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी सदर गाळे तातडीने वितरित करण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली.