अंतर्गत आरक्षणासाठी 1 ऑगस्ट रोजी राज्यभरात आंदोलन
माजी केंद्रीय मंत्री ए. नारायणस्वामी यांची माहिती : मादिग समुदायाच्या संघटनांचा निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
अंतर्गत आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मादिग समुदायाच्या विविध संघटनांनी 1 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री ए. नारायणस्वामी यांनी दिली. मंगळवारी बेंगळुरातील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ए. नारायणस्वामी पुढे म्हणाले, न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिलेल्या निकालाला 1 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होईल. जर 10 तारखेला मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन तो सभागृहात सादर केला नाही तर राज्यातील मादिग समुदायाकडून कर्नाटक बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल. 4-5 हजार लोकांची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
अंतर्गत आरक्षण लागू न केल्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी म्हटले होते. त्या दृष्टीने मादिग समुदाय पावले उचलणार आहे. मादिग समिती साडेतीन दशकांपासून अंतर्गत आरक्षणासाठी लढा देत आहे. तेलंगणातील मादिगांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी 1999 मध्ये अंतर्गत आरक्षण लागू केले होते. नंतर 2004 मध्ये तेथील उच्च न्यायालयाने अंतर्गत आरक्षण आवश्यक असल्याचे म्हटले होते, असेही ए. नारायणस्वामी म्हणाले.
16 ऑगस्टपासून आरक्षण लागू करा : कारजोळ
यावेळी बोलताना माजी उपमुख्यमंत्री तथा खासदार गोविंद कारजोळ यांनी, 16 ऑगस्टपासून अंतर्गत आरक्षण लागू करण्यासाठी प्रयत्न करावेत. राज्य सरकारने मादिग समाजाला असहकार आंदोलन करण्यासाठी संधी देऊ नये, असे सांगितले.