प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री दिल्लीत दाखल
दामू नाईक यांची संतोष यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा : येत्या दोन दिवसात महत्वाच्या घडामोडींची शक्यता
पणजी : राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यासंदर्भात प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी भाजपचे वरिष्ठ नेते बी. एल. संतोष यांच्याशी मंगळवारी दिल्लीत अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आसाम येथून थेट दिल्लीला पोहोचले असून ते देखील रात्री महत्त्वाची चर्चा पक्षश्रेष्ठींकडे करणार आहेत. प्राप्त माहितीनुसार दोघा मंत्र्यांचा पुढील आठवड्यात मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. गेले दीड वर्ष मंत्रिमंडळाची फेररचना हा विषय वारंवार चर्चिला जात आहे. प्रत्यक्षात गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर ही प्रक्रिया लवकर होईल असा अंदाज होता. मात्र त्यांना मंत्रिमंडळातून वगळून एक महिना उलटून गेला तरीही फेरचनेचे नाव घेतले जात नाही.
राजकीय वर्तुळात उत्सुकता
अलीकडेच सभापती रमेश तवडकर हे सभापती पदाचा लवकरच राजीनामा देतील, असा अंदाज वर्तविला जात होता मात्र या अंदाजाला सभापतींनी सध्या तरी छेद दिलेला आहे. ते मंत्रिपद स्वीकारतीलच असे नाही. त्यामुळे ते सभापतीपदी कायम राहतील असा अंदाज होता. तथापि प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक हे मंगळवारी अचानक नवी दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
मुख्यमंत्रीही दिल्लीत दाखल
दामू नाईक यांना पक्षश्रेष्ठींनी तातडीने बोलून घेतले. तसेच आसामच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही थेट गोव्यात न जाता दिल्लीला या, असे पक्षश्रेष्ठींनी कळविले. त्यानुसार मुख्यमंत्री सायंकाळी दिल्लीला पोचले आहेत. रात्री ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत.
दोघांचा होणार समावेश
प्राप्त माहितीनुसार आणखी दोघा मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल. जर दोन मंत्र्यांचा समावेश होत असेल याचा अर्थ एकतर आणखी एका मंत्र्याला अर्धचंद्र देण्यात येईल किंवा सभापतींनाच राजीनामा देण्यास सांगितले जाईल. त्यामुळे तवडकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. शिवाय दिगंबर कामात यांनाही मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतले जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत असलेले तिसरे आमदार मायकल लोबो, यांनाही मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्याचा प्रस्ताव आहे. मात्र नेमका कोणता निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील हे येत्या दोन दिवसात उघड होईल. भारतीय स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर 16 किंवा 17 ऑगस्ट रोजी राज्यातील राजकीय हालचाली वाढतील आणि नेमके कोणाचे राजीनामे हातात येतात हे पहावे लागेल. प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी पक्षश्रेष्ठींबरोबर बराच वेळ चर्चा केलेली आहे.
महामंडळे, खात्यांमध्येही होणार बदल
मंत्रिमंडळ पुनर्रचनेबरोबरच अनेक महामंडळांची पुनर्रचना देखील केली जाणार आहे. सध्या विद्यमान मंत्री आपापल्या खात्यांना हात लावू नका अशी विनंती करीत असले तरी सर्व मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात. मुख्यमंत्री याबाबतीत पक्षश्रेष्ठींना नेमके काय सांगतील आणि कोणता अंतिम निर्णय होतो, याकडे गोव्यातील सर्वांचे लक्ष लागून आहे.