राज्य ऑलिंपिक असोसिएशनची निवडणूक रंगणार
पुणे : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी खो खो असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी अर्ज दाखल केला असून, त्यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ हे सुध्दा शुक्रवारी सकाळी 11 वाजता अर्ज भरणार आहेत.
संघटनेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. आतापर्यंत अजित पवार तीन वेळा अध्यक्षपद म्हणून कार्यरत राहिले आहेत. आता ते चौथ्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याची अंतिम तारीख 11 ऑक्टोबर आहे.
अजित पवार यांनी 2013 पासून महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्षपद भूषवले आहे. अजित पवारांनी महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेकरवी ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला आहे. 2006 ते 2018 यादरम्यान महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. सात वर्षांचा कुलींग ऑफ पीरियड झाल्यानंतर 2025 मध्ये ते पुन्हा राज्य खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.
फडणवीसांशी चर्चा करुन अर्ज
दरम्यान, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात मुरलीधर मोहोळ हे अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली असून त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता हा फॉर्म ते भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जाधव, शिरोळे यांचाही अर्ज
महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्यासह इतर व्यक्तींनीही अर्ज दाखल केला. यामध्ये चंद्रजीत जाधव, प्रदीप गंधे, स्मिता शिरोळे, संजय वळवी, बाबुराव चांदेरे, मनोज भोरे, संदीप ओंबासे व रणधीर या व्यक्तींचा समावेश आहे. चंद्रजीत जाधव यांनी खजिनदार व सरचिटणीस या दोन पदांसाठी अर्ज दाखल केला आहे.