राज्य महिला काँग्रेस अध्यक्षपदी सौम्या रेड्डी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राष्ट्रीय काँग्रेसकडून कर्नाटकसह तीन राज्यांसाठी महिला अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. कर्नाटक महिला काँग्रेस अध्यक्षपदी माजी आमदार सौम्या रेड्डी यांची नेमणूक करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य सचिव के. सी. वेणूगोपाल यांनी मंगळवारी रात्री यासंबंधीचा आदेश जारी केला. काँग्रेस अध्यक्षांच्या सूचनेवरून अरुणाचल महिला काँग्रेस अध्यक्षपदी चुकू नाची यांची तर चंदीगढ महिला काँग्रेस अध्यक्षपदी नंदिता हुडा यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सौम्या रेड्डी या परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांच्या कन्या आहेत. त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पर्यावरण विषयातून एमएस पदवी घेतली आहे. 2013 मध्ये त्यांची अॅनिमल्स वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या संचालकपदी निवड झाली होती. 2016 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश करत केपीसीसी महिला काँग्रेसमध्ये सचिवपद सांभाळले. 2017 मध्ये बेंगळूर शहर युवा काँग्रेसचे उपाध्यक्षपद भूषविले. 2018 मध्ये बेंगळूरच्या जयनगर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला. 2019 मध्ये सौम्या रेड्डी यांची अखिल भारत महिला काँग्रेसच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बेंगळूर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवली.