‘स्पीड ऑफ डोईंग’वर राज्य सरकारचा भर
उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांची माहिती
बेळगाव : कर्नाटक राज्याचे कामगार धोरण देशात सर्वोत्तम आहे. कामगार खाते आता ‘इज ऑफ डोईंग’ला फाटा देऊन ‘स्पीड ऑफ डोईंग’वर भर देत आहे. यामुळे गुंतवणूक करण्यासाठी येणाऱ्या कंपन्यांना जलदगतीने सर्व प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत आहे. पुढील काळात कर्नाटक सर्वोत्कृष्ट इज ऑफ डोईंग बिझनेस हब होणार आहे. आतापर्यंत गुंवतणूक झालेल्यापैकी बेंगळूरसह उत्तर कर्नाटकात गुंतवणूक झाल्याची माहिती उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद सदस्य केशवप्रसाद यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. विविध कंपन्या राज्यात गुंतवणुकीसाठी इच्छुक असून आपला स्टार्टअप सुरू करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नयेत याबाबत सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे.