राज्य सरकारचे आज दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री होणार सहभागी
प्रतिनिधी/ बेंगळूर
केंद्र सरकारकडून राज्यावर झालेला अन्याय, अनुदान देण्याच्या बाबतीत भेदभावाचा निषेध नोंदविण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य काँग्रेस सरकार बुधवारी नवी दिल्लीत ‘जंतरमंतर’वर आंदोलन करणार आहे. ‘माझा कर, माझा हक्क’ या शीर्षकाखाली राज्यातील सर्व मंत्री, काँग्रेसचे आमदार आंदोलन करणार असून राज्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव जनतेला करून देतील. सिद्धरामय्या यांनी राज्यातील सर्व भाजप खासदारांनाही पत्र पाठवून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
केंद्र सरकारविरोधात ‘चलो दिल्ली’चा नारा देत राज्यातील सर्व मंत्री दिल्लीला रवाना झाले. केंद्र सरकारकडून राज्याला अनुदान देण्याच्या बाबतील अन्याय केला जात आहे. दुष्काळी निधी देण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाही, असा आरोप करून काँग्रेस नेते दिल्लीत आंदोलन छेडणार आहेत.
केंद्र सरकारकडून 2017-18 पासून 1 लाख 87 हजार कोटी रुपये अनुदान आणि कराच्या वाट्यामध्ये राज्यावर अन्याय होत आहे. केंद्र सरकारकडून होणाऱ्या अन्यायाचा निषेध नोंदविण्यासाठी 7 फेब्रुवारी रोजी ‘चलो दिल्ली’ अभियान राबविणार असून तेथे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात येणार आहेत. त्यानुसार दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलनासाठी सज्जता करण्यात आली आहे. आंदोलनामागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार सोमवारी सायंकाळीच दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी मंगळवारी आंदोलनस्थळी भेट देऊन पूर्वतयारीची पाहणी केली. सिद्धरामय्या देखील सहकाऱ्यांसमवेत मंगळवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले.
सर्व खासदारांना सिद्धरामय्यांचे पत्र
दिल्लीतील आंदोलना सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सर्व केंद्रीय मंत्र्यांना आणि खासदारांना पत्र पाठविले आहे. राज्यातील नागरिकांचे हक्क आणि स्वाभिमानावर केंद्राकडून सातत्याने अन्याय होत आहे. राज्याला कराचा योग्य वाटा न देता अन्याय केला जात आहे. याविरोधात बुधवारी जंतरमंतरवर होणाऱ्या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा द्यावा, असे पत्र त्यांनी केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामन, प्रल्हाद जोशी, शोभा करंदलाजे, भगवंत खुबा, ए. नारायणस्वामी, राजीव चंद्रशेखर यांना पत्र पाठविले आहे. तसेच खासदार मल्लिकार्जुन खर्गे, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासह सर्व खासदारांना पत्र पाठविले आहे.