राज्य सरकारची शेतकऱ्यांविरुद्ध कृती
माजी आमदार संजय पाटील यांचा आरोप : नुकसान झालेल्या पिकांची पाहणी
बेळगाव : जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात झालेल्या मोठ्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकार भरपाई न देता उलट वस्तुंची भाववाढ करून सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण करत आहे, असा आरोप माजी आमदार संजय पाटील यांनी केला. माजी आमदार पाटील यांनी मुतगा व मारिहाळ येथील नुकसान झालेल्या शेतवडीला शनिवारी भेट दिली. त्यानंतर ते शेतकऱ्यांशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी कंगाल बनला आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी राज्य सरकार वेळ मारून नेत आहे. काही शेतकरी नैराश्येतून आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही कारणाने निराश न होता धैर्याने राहावे, भाजप शेतकऱ्यांशी पाठीशी आहे.
शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन यापूर्वीच्या बी. एस. येडियुरपा नेतृत्वातील सरकारने मदतीचा हात पुढे केला होता. पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, बागायतदारांना, घरांमध्ये पाणी शिरुन नुकसान झालेल्यांना, पावसामुळे घर जमीनदोस्त झालेल्यांना मदत केली आहे. आताच्या सरकारकडून शेतकरी व आपद्ग्रस्तांसाठी कोणतीच कृती होत नाही. या सरकारने भाववाढ करून शेतकरी, कुली कामगार व सर्वसामान्यांचे जीवन असह्या केले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी नेतृत्वातील सरकारने करात सुधारणा केली आहे. वस्तूंवरील कर कमी करून संपूर्ण जगाचेच लक्ष वेधून घेतले आहे. भाजप हे जनतेचे सरकार हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, असे माजी आमदार पाटील म्हणाले.
नुकसानभरपाईसाठी सरकारकडे पाठपुरावा करावा
दरम्यान, शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. पीक हानीबद्दल त्वरित भरपाई देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे मंडल भाजप अध्यक्ष युवराज जाधव, उमेश पुरी, लक्ष्मण देवगोजी, अडिवेश अंगडी, सिद्धय्या पुजार आदी यावेळी उपस्थित होते.