राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता 14.25 टक्क्यांवर
महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ : 1 जुलैपासून लागू होईल याप्रमाणे अंमलबजावणी
बेंगळूर : राज्य सरकारने बुधवारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे हा भत्ता आता महागाई भत्ता 14.25 टक्क्यांवर गेला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच खूशखबर मिळाली आहे. सुधारित भत्तावाढ 1 जुलैपासून लागू होईल याप्रमाणे जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली होती. केंद्र सरकारकडून भत्तावाढ झाल्यानंतर राज्य सरकारकडूनही भत्तावाढ करण्याची पद्धत आहे. कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सी. एस. षडाक्षरी यांनी राज्य सरकारकडे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 2 टक्क्यांनी भत्तावाढ करण्यास मंजुरी दिली आहे. बुधवारी यासंबंधी अधिकृत आदेश जारी करण्यात आला. त्यानुसार मूळ वेतनानुसार 12.25 टक्के असणारा महागाई भत्ता 14.25 टक्के झाला आहे. भत्तावाढ झाल्याबद्दल सी. एस. षडाक्षरी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आभार मानले आहेत. त्यांनी मंगळवारी याबाबत माहिती देऊन दोन-तीन दिवसांत अधिकृत आदेश येणार असल्याचे सांगितले होते.